अंजणारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; चालक केबिनमध्ये अडकला, पोलिस-अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी वाचला जीव

लांजा, दि. ३ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण ट्रेलर अपघातात चालकाचा जीव थोडक्यात बचावला. ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलरवरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि चालक केबिनमध्ये अडकून पडला. पोलिस, अग्निशमन दल आणि इतर बचाव यंत्रणांनी वेळेवर धाव घेतल्याने चालकाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

ही घटना सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अंजणारी घाटातील बसथांब्याजवळ घडली. रत्नागिरीकडून गोव्याच्या दिशेने जाणारा एमएच-४६-डीसी-२७६३ क्रमांकाचा ट्रेलर अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर संरक्षक कठड्यावर धडकला. या अपघातात ट्रेलरमधील कोटेड कॉईल मालाचेही मोठे नुकसान झाले.

जखमी चालकाची ओळख राजकुमार रामकिशोर साहू (वय ३५, रा. लोही, जि. रिवा, मध्य प्रदेश) अशी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले, उपनिरीक्षक श्रीमती मैनदाड, एएसआय तळेकर तसेच पोलीस कर्मचारी दोरखंडे, खेडेकर आणि इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक नियंत्रणात ठेवत बचावकार्याला सुरुवात केली.

चालक केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकला असल्याने एमआयडीसी रत्नागिरी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे, चालक हर्षल आखाडे, अग्निशमन विमोचक प्रवीण पवार, प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे आणि देवराज बंडगर यांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रेलरची केबिन उघडून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकेद्वारे त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परतेने वाहतूक नियोजन करत अल्पावधीतच वाहतूक पूर्ववत सुरू केली. या बचाव मोहिमेत लांजा पोलीस ठाणे, हातखंबा वाहतूक मदत केंद्र, अग्निशमन दल, १०८ रुग्णवाहिका सेवा, जेसीबी यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटेअपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेमुळे जखमी चालकाचा जीव वाचविण्यात यश आले. आपत्कालीन परिस्थितीत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने दाखविलेली तत्परता, समन्वय आणि मानवतावादी भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

आणखी वाचा