रत्नागिरी, दि. २३ : दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी रत्नागिरीत काढण्यात आलेल्या विद्यार्थी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप महायुतीने गंभीर आक्षेप नोंदवत या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात राजकीय आंदोलन करण्यासाठी होता, असा सवाल महायुतीने उपस्थित केला आहे.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे समर्थन नसल्याचे स्पष्ट करत, काही शाळकरी विद्यार्थ्यांना दबाव टाकून मोर्चात सहभागी करण्यात आल्याचा आरोप केला. यासंदर्भातील पुरावे महायुतीकडे असून, संबंधित शैक्षणिक संस्थांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या घोषणांचे व्हिडिओ संकलित करण्यात येत असून, त्याआधारे संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महायुतीने केली आहे.
पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.







