शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील एका युगाचा अस्त

कोल्हापूर, दि. ४ : देश-विदेशात १८० हून अधिक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांची उभारणी करून शिक्षणाची ज्ञानगंगा गावागावांत पोहोचविणारे शिक्षणमहर्षी, पद्मश्री तथा बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. पाटील यांचे पार्थिव बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर कसबा बावडा येथील ‘यशवंत’ निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे. कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी राजकारणात आमदार, मंत्री आणि तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. मात्र, त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला आयुष्य वाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सात स्वतंत्र विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन आणि इतर उच्च शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबईतील आधुनिक रुग्णालये तसेच नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियम ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पाटील यांना समाजकारण, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यतपस्वी नेतृत्व संबोधत त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे म्हटले आहे. शिक्षणसेवेची त्यांनी निर्माण केलेली परंपरा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना “महान शिक्षणमहर्षी आणि दूरदृष्टीचे नेतृत्व” अशी श्रद्धांजली वाहत, त्यांनी देशातील उच्च शिक्षणाला नवी दिशा दिल्याचे सांगितले. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांच्या निधनाने देशाने दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि प्रेरणादायी सार्वजनिक नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली.

शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत उभारलेला डॉ. डी. वाय. पाटील यांचा भक्कम वारसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याच्या भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.

आणखी वाचा