सावर्डेचा मंडळ अधिकारी ५ हजाराची लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

सातबारा फेरफार मंजुरीसाठी ५ हजारांची लाच

सावर्डे, दि. ५ : जमिनीच्या खरेदीखताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे (ता. चिपळूण) येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव (वर्ग-३, महसूल विभाग) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात दुपारी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी ४८ वर्षीय निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने ३ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने पत्नीच्या नावे मौजे सावर्डे येथील गट क्रमांक १३४७/३ मधील २१८ चौरस मीटर जागा खरेदी केली होती. या व्यवहाराची सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अनिल जाधव यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने सापळा रचला. दुपारी सुमारे ३.१० वाजता तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारून ती स्वतःजवळील नोटबुकमध्ये ठेवण्यास सांगताना जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे तसेच संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि प्रशांत कांबळे यांचा सहभाग होता.

दरम्यान, शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.

आणखी वाचा