रत्नागिरी, दि. ५ : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत असताना पाली परिसरात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांत शोककळा पसरली.
राजेश सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सातत्याने काम केले. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन विस्तार, जनसंपर्क आणि पक्षवाढीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू वृत्ती, साधी राहणी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते सर्व स्तरांवर लोकप्रिय होते.
त्यांच्या निधनामुळे भाजपसह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
राजेश सावंत यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या अकाली निधनाने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.








