राजापूर, दि. २९ : सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साइट खनिज उत्खनन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाला सर्वपक्षीय तसेच सर्व स्तरातून विरोध दर्शविण्यासाठी रविवारी दुपारी २.३० वाजता सागवे येथील जनता विद्यालयात सर्वपक्षीय विरोध सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनी दिली.
प्रस्तावित बॉक्साइट उत्खननामुळे सागवे परिसरातील जमीन, जलस्रोत, पर्यावरण, शेती आणि स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने भूमिका घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सभेला सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘ही लढाई कोणत्याही एका पक्षाची नसून गावाच्या अस्तित्वाची आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याची आहे,’ अशी भूमिका आयोजकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सागवेतील बॉक्साइट उत्खननाला सर्वपक्षीय विरोधाची दिशा या सभेत निश्चित होण्याची शक्यता आहे.
तसेच प्रकल्पाविरोधात भविष्यात कोणती भूमिका घ्यायची, आंदोलनाची दिशा काय असावी आणि स्थानिक पातळीवर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबतही चर्चा होणार आहे. सागवेची भूमी, जलसंपदा, पर्यावरण आणि शेतीचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन कमलाकर कदम यांनी केले आहे.








