चिपळूण, दि. २९ : चिपळूण-धामणंद मार्गावरील खांदाट गवळवाडी येथे शनिवारी दुपारी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले असून, त्यामध्ये १८ प्रवासी, दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर काहींवर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास चिपळूणहून चोरवणेकडे जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणच्या दिशेने येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी येथील वळणावर समोरासमोर आदळल्या. दोन्ही बसची धडक एवढी जोरदार होती की, त्यांच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली. काही प्रवाशांच्या डोक्याला, जबड्याला आणि हनुवटीला गंभीर दुखापत झाली असून, काहींचे दातही पडल्याची माहिती आहे.
अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच खांदाटपाली, आंबडस आणि चिरणी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य केले. त्यानंतर रुग्णवाहिका तसेच उपलब्ध वाहनांच्या मदतीने जखमींना कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
खांदाट गवळवाडी परिसरातील हा मार्ग तीव्र उतार आणि धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिपळूण पोलिसांकडून पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू करण्यात आला असून, तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चिपळूण आगाराचे आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांच्यासह एसटीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चिपळूण पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातामुळे मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही बस हटविण्यात आल्या आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कामथे उपजिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. एसटीचे अधिकारी रुग्णालयात उपस्थित राहून जखमी प्रवाशांच्या उपचाराची माहिती घेत होते.
या मार्गावरील धोकादायक वळणे आणि तीव्र उतार लक्षात घेता, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अधिक खबरदारी घेण्याची गरज या अपघातातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.








