मुंबई, दि. ०१ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाट्य संस्थांनी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
यंदाच्या स्पर्धेत हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांसह बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचा समावेश आहे. हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांना १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. २३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर २०२६ पासून राज्यातील १० केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तसेच ६५ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबरपासून आयोजित करण्यात येणार आहे.
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्था तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना विहित नमुन्यातील प्रवेशिका व स्पर्धेचे नियम https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत. आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशिका २५ सप्टेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा प्रवेशिकेतील तपशील अपूर्ण असल्यास ऑनलाइन अर्ज पूर्ण करता येणार नाही. स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर निश्चित केंद्रावर व दिलेल्या तारखेला प्रयोग सादर न करणाऱ्या संस्थेची अनामत रक्कम शासनाच्या कोषागारात जमा करण्यात येईल. स्पर्धेचे शासनाने निश्चित केलेले नियम संस्थांना बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित संस्था अपात्र ठरविण्यात येईल.
राज्यातील अधिकाधिक नाट्य संस्थांनी या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.








