देवरुख, दि. ४ : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील शेतकऱ्याच्या दोन वर्षांच्या पाड्यावर दिवसा बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता शिवणे गावातील बारकोंबडा परिसरात घडली. या हल्ल्यात संजय भिकाजी पानगले यांचा पाडा जखमी झाला असून, दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
करंबेळे महाडिकवाडी येथील संजय पानगले यांच्याकडे सात-आठ पाळीव जनावरे आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते जनावरे चारण्यासाठी शिवणे येथील बारकोंबडा परिसरात घेऊन गेले होते. काही वेळाने घरी जाऊन परत आल्यानंतर त्यांना गुरांचा हंबरडा ऐकू आला. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता बिबट्या दोन वर्षांच्या पाड्याच्या मानेचा चावा घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पानगले यांनी आरडाओरडा केल्याने तसेच गुरांचा आवाज झाल्याने बिबट्या घाबरून जंगलाच्या दिशेने पळून गेला. हल्ल्यात पाड्याच्या मानेवर जखम झाली असून, घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी पाड्यावर उपचार केले.
दरम्यान, यापूर्वी शेवरेवाडीतील नाचरे यांच्या पोल्ट्रीतील कोंबड्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. ताम्हाणे येथे दिवसा बिबट्याचे दर्शन, तसेच वांझोळे-सुवारेवाडी येथे घरात घुसून कोंबड्या मारताना प्रतिभा दळवी यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.








