नवी मुंबई, दि. ०९ (चंद्रशेखर हेंडवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा, शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा तसेच मुंबईतील त्यांच्या वास्तव्याशी संबंधित ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचार’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम बॅचचा एकदिवसीय मुंबई अभ्यास दौरा ३ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. या दौऱ्यात ५० हून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आयोजित या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी, वास्तव्याशी तसेच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक चळवळीशी निगडित महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट दिली. दादर येथील चैत्यभूमी, राजगृह, वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर समाधी स्मारक, सिद्धार्थ महाविद्यालयातील बुद्ध भवन, आंबेडकर महाविद्यालय वडाळा आणि परळ येथील बी.आय.टी. चाळ या स्थळांचा दौऱ्यात समावेश होता. या स्थळांच्या भेटीतून बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष, ज्ञानसाधना, सामाजिक चळवळ आणि मुंबईशी असलेले त्यांचे अतूट नाते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले.
सिद्धार्थ महाविद्यालयातील बुद्ध भवन येथे बाबासाहेबांशी संबंधित ऐतिहासिक ठेवा पाहण्याची संधी हा या अभ्यास दौऱ्याचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला. बाबासाहेब अभ्यास, बैठका आणि चर्चांसाठी वापरत असलेल्या खोली क्रमांक ३२ शी संबंधित ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच त्यांची लायब्ररी, त्यांनी लिहिलेल्या नोंदी व डायऱ्या, वापरलेल्या वस्तू, खुर्ची, पुस्तकांचा संग्रह तसेच ब्रिटिशांकडून प्राप्त झालेला पुस्तकसंच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिला. पुस्तकांमधून अभ्यासलेला इतिहास प्रत्यक्ष वास्तू, वस्तू आणि दस्तऐवजांच्या माध्यमातून अनुभवता आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि प्रेरणेची भावना निर्माण झाली.
या दौऱ्यादरम्यान प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पवार तसेच मोहिते सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक कार्याचा विविध अंगांनी अभ्यास करता आला.
बेस्टचे अधिकारी आणि या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मिलिंद गायकवाड यांनी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित विविध स्थळांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. ऐतिहासिक वास्तू, बाबासाहेबांचे वास्तव्य आणि त्यांच्या कार्याशी संबंधित घटनांचा संदर्भ त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने स्पष्ट केला. त्यामुळे दौऱ्याला अधिक माहितीपूर्ण आणि जिवंत स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
या बॅचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले नागरिक या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पुन्हा विद्यार्थी म्हणून एकत्र आले आहेत. वकील, शिक्षक, पोलीस अधिकारी-कर्मचारी, अभियंते, पत्रकार, बँक कर्मचारी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त नागरिकांचा या बॅचमध्ये समावेश आहे. व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव असतानाही बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी सर्वांनी विद्यार्थीदशेचा अनुभव घेतला.
अभ्यासासोबतच या दौऱ्यात आनंद, मैत्री आणि आपुलकीचे वातावरणही निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांसोबत कुटुंबीय सहभागी झाल्याने या उपक्रमाला कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले. ऐतिहासिक स्थळांना भेटी, चर्चा, माहितीचे आदान-प्रदान आणि सहकाऱ्यांसोबतचे आनंदाचे क्षण यामुळे हा दौरा सहभागींसाठी अविस्मरणीय ठरला.
नीता डुबे, सुनीता दौंडकर, सानिका शेट्ये, रविंद्र शेजोळे, चंद्रशेखर हेंडवे, माधुरी लोखंडे, अश्विनी लोखंडे, हर्षवर्धन गोडबोले, मिलिंद गायकवाड, अमित कासारे, प्रकाश देठे, उषा देठे, स्मिता लोखंडे, अजय वाघमारे, मोहन गायकवाड, रुपाली शिंगे, राजेश शिंगे, अनुष्का मोरे, यशवंत गोडघाटे, रेवती नायर, विकास जगताप, पूनम जगताप, दीपक गवई, कल्पना गोसावी, आशा गायकवाड, सुयोग खरे, सिद्धार्थ शिरसाळे, रवींद्र केदारे, रमेश शिराळ, सुमेध पारधे, मैत्रेयी सोनवणे, अनुराधा शेजोले, वंदना अंभोरे, प्रज्ञानंद रघुनाथ गायकवाड, राजेश कांबळे, दत्तात्रय गायकवाड, साहेबराव घोडेस्वार, संध्या बिडकर, राजेश सातपुते, मिस सातपुते, छाया गोसावी, भारती शिराळ आदींचा या अभ्यास दौऱ्यात सहभाग होता.

सैद्धांतिक अभ्यासाला प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांच्या भेटीची जोड देणारा हा उपक्रम प्रथम बॅचसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. बाबासाहेबांचे जीवन, विचार, ज्ञानसाधना आणि सामाजिक संघर्ष प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देणारा हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील प्रेरणादायी आणि अविस्मरणीय पर्व ठरला.








