राजापूर, दि. १२ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील उद्यमनगर परिसरातील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी अयान मुश्ताक खान याने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अयानची आगामी विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, पंचायत समिती राजापूर, राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना आणि तायक्वांदो अकॅडमी राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अयान हा गेल्या तीन वर्षांपासून राम कररा आणि रेखा कररा यांच्या युवा तायक्वांदो अकॅडमीमध्ये नियमित प्रशिक्षण घेत आहे. या अकॅडमीत विद्यार्थ्यांना तायक्वांदोचे तंत्र, शारीरिक व्यायाम, आत्मसंरक्षणासोबतच शिस्त आणि आत्मविश्वासाचे धडे दिले जातात. सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर अयानने जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून आपल्या कौशल्याची छाप पाडली.
अयानच्या या यशाबद्दल फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या व्यवस्थापक सिस्टर नाताल, मुख्याध्यापिका सिस्टर सिल्विया तसेच क्रीडाशिक्षक विनया मोरे, मुश्ताक खान आणि रुही खान यांनी त्याचे अभिनंदन केले. आगामी विभागीय स्पर्धेतही अयानने उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन करावे, यासाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
अयानच्या यशामुळे रत्नागिरीच्या शालेय क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्या पुढील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.








