मुंबई, दि. २ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला. मतदारयादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत, सरकारने ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेतला नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे दिपके यांनी सांगितले. तीन दिवस नव्हे, तर तीन महिने तुरुंगात ठेवले तरी आंदोलनासाठी पुन्हा येऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबईसह देशातील विविध भागांतून तरुणांनी उपस्थिती लावली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी फलक झळकावले. घोषणा, जलसे आणि पथनाट्याच्या माध्यमातून मतदारयादी, मतदानाचा अधिकार आणि लोकशाही प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. मैदानाच्या सहाव्या प्रवेशद्वाराजवळ एका ट्रकवर आंदोलनाचे व्यासपीठ उभारण्यात आले होते.
‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून केंद्रावर टीका
यावेळी बोलताना अभिजीत दिपके यांनी भाजपाची वाटचाल ‘वन नेशन, वन इलेक्शन’कडून ‘वन नेशन, वन पार्टी’कडे सुरू असल्याचा आरोप केला. देशातील मोठ्या संख्येने मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रक्रियेमागे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची भूमिका असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली.
दिपके यांच्या म्हणण्यानुसार, मतदारयादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेमुळे नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण देऊन ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
![]()
२०२४च्या निवडणुकीबाबतही आरोप
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित खासदारांची संख्या न आल्याने भाजपाकडून महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला. मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आल्यामुळे काही विरोधी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला.
मागील दोन वर्षांत सुमारे १३ कोटी मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. काही राज्यांमध्ये विरोधकांची सरकारे येऊ देऊन महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या मोठ्या राज्यांमध्ये वेगळे राजकीय गणित राबवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या दाव्यांबाबत स्वतंत्र अधिकृत पुरावे त्यांनी आंदोलनस्थळी सादर केल्याचे नमूद झाले नाही.
२०२२ ते २०२६ या कालावधीत निवडणूक जिंकल्यानंतर १११ विद्यमान खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलल्याचा दावाही दिपके यांनी केला. पक्षांतराच्या राजकारणावर टीका करत त्यांनी आमदार-खासदारांच्या राजकीय हालचालींवर प्रश्न उपस्थित केले.
‘आमदार-खासदारांचा लिलाव करा’
प्रादेशिक पक्षांमधील फुटीच्या घटनांवरूनही दिपके यांनी केंद्रातील सत्ताधारी राजकारणावर टीका केली. भाजपाला प्रादेशिक पक्ष संपवायचे असल्याचा आरोप करत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा संदर्भ दिला. आमदार आणि खासदार पक्ष बदलत असतील तर निवडणुकांची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. आमदार-खासदारांचा आयपीएल सामन्यांप्रमाणे लिलाव करा, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आणि सूरत ते गुवाहाटी या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत दिपके यांनी आपली भूमिका मांडली.
हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून राजकीय पक्षांवर टीका
गेल्या काही वर्षांतील देशातील राजकारण हिंदू-मुस्लिम मतभेदांच्या मुद्द्यावर केंद्रित करण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला. धर्माच्या नावावर नागरिकांमध्ये भीती निर्माण करून त्यांना विविध प्रश्नांपासून दूर ठेवले जात असल्याचे ते म्हणाले.
२०२४मध्ये विविध विरोधी पक्ष एकत्र आल्याने सत्ताधाऱ्यांना राजकीय आव्हान निर्माण झाल्याचा दावा करत मतविभाजनाचे राजकारण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. आता हिंदू-मुस्लिम मतभेद बाजूला ठेवून भारतीय म्हणून एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही पक्षाला समर्थन द्या; मात्र देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी नागरिकांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
घोषणांनी शिवाजी पार्क परिसर दणाणला
दरम्यान, आंदोलनस्थळी तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. ‘हमारे वोट का हिसाब, हमें दे दो ज्ञानेश कसाब’, ‘एक जिया दोन अजवाईन, ज्ञानेश कुमार दो रिजाईन’, ‘एक बिस्किट दोन चाय, ग्यानू कुमार बाय बाय’, ‘ग्यानू बाबू इट्स डन ब्रो’ आणि ‘एक चाय दोन खारी, ग्यानू अब तेरी बारी’ अशा घोषणा देण्यात आल्या.
तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकांचाही आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. विविध क्षेत्रांतील काही व्यक्तींनी आंदोलनाला उपस्थिती लावली. कामाठीपुरातील काही महिलांनीही आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा व्यक्त केला.
उन्हापासून बचावासाठी वैद्यकीय मदत
ऑक्टोबरच्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली होती. नवी मुंबईचे डॉ. नितीन दिघे आणि खोपोलीचे डॉ. पठाण यांनी स्वयंप्रेरणेने प्रथमोपचाराची सेवा दिली. आंदोलनस्थळी त्रास झाल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. सकाळपासून आंदोलकांना सुमारे ३५० ओआरएस पाऊच वितरित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
शिवसेनेचा पाठिंबा कायम : महेश सावंत
शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आंदोलनाला उपस्थित राहू शकले नसले तरी शिवसेनेचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा कायम राहील, असे सावंत यांनी सांगितले.
‘तरुण आहेत तोपर्यंत गांधी जिवंत’
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बोलताना लोकशाही आणि नागरिकांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला. आपण आपल्या अधिकारांसाठी लढत आहोत, यापेक्षा गांधींना मोठी श्रद्धांजली असू शकत नाही, असे ते म्हणाले.
गांधींच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न झाला तरी ते विचार संपणार नाहीत. जोपर्यंत युवक लोकशाही आणि नागरिकांच्या अधिकारांसाठी आवाज उठवत आहेत, तोपर्यंत गांधींचे विचार जिवंत राहतील, असे दिपके म्हणाले. नथुराम गोडसेचा संदर्भ देत त्यांनी गांधी विचारांवर भाष्य केले.
भारताच्या लोकशाही व्यवस्थेत मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित करताना दिपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचाही उल्लेख केला. गांधी देशाचा आत्मा, आंबेडकर देशाचा कणा आणि नेहरू देशाचे मन असल्याचे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका
यावेळी दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. मोदी स्वतःला ‘नॉन-बायोलॉजिकल’ म्हणतात आणि स्वतःला ‘विश्वगुरू’ म्हणवून घेतात, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधानांनी स्वतःची तुलना महात्मा गांधी यांच्याशी करू नये, असेही ते म्हणाले.
नोटबंदीपासून कोरोना काळापर्यंत नागरिकांना रांगेत उभे करण्याचे काम मोदी सरकारने केले, अशी टीकाही दिपके यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यांदरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही आंदोलनाला समर्थन दिले. देशातील अनेक क्रांतींची सुरुवात मुंबईत झाली असून, हा दिवसही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचे अभिनंदन केले. तरुणाई जागृत असल्याचे या आंदोलनातून दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली असून, मागणी मान्य न झाल्यास पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.








