चिपळूण, दि. २२ (प्रतिनिधी): परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. सदिच्छा समारंभ म्हणजे एक संमिश्र भावनांचा क्षण असतो.नवीन शाळेत जायला मिळणार ही एक ओढ असते. तर,जुनी शाळा सोडायला लागणार याचं दुःख असतं.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून याच भावना व्यक्त केल्या आपला शिशुविहारच्या खेळ गटापासून चौथीपर्यंतचा प्रवास व या प्रवासामध्ये आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांचे योगदान कसे होते,याचे वर्णन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत मांडण्याचा सुंदर प्रयत्न केला. यावेळी सुमारे ५३ विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नाईक मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातील मुख्य मुद्द्यांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यात तंत्रज्ञानाचा उपयोग कशाप्रकारे केला पाहिजे,मोबाईलच्या अति वापराचे दुष्परीणाम, चांगल्या मित्रांचे महत्त्व, आपल्या यशामध्ये आपल्या शिक्षकांचे आपल्या पालकांचे असलेले योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट म्हणून ब्लूटुथ स्पीकर्स दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती शिंदे व सौ.अश्विनी दाभोळकर यांनी केले. हा कार्यक्रम इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक सौ.प्राची गगनग्रास, श्रीम.नेहा पाटील, श्री.आशिष मांडवकर,सौ.ज्योती शिंदे, सौ.अश्विनी दाभोळकर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने संपन्न झाला.








