रत्नागिरीत आंबा व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या

रत्नागिरी, दि. १३ : शहरात एका धक्कादायक घटनेत ५० वर्षीय आंबा व्यावसायिकाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तोणदे येथील राहत्या घरी ही घटना घडली असून या प्रकारामुळे रत्नागिरीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत व्यक्तीची ओळख रुपेश उर्फ बाब्या प्रकाश नागवेकर अशी झाली आहे. ते तालुक्यातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. प्राथमिक माहितीनुसार, आजारपण आणि आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागवेकर हे हापूस आंबा व्यवसायाशी संबंधित होते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या क्षेत्रात मोठा व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. ते स्थानिक पातळीवर मिळून मिसळून वागणारे, हसमुख आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागवेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे.

दरम्यान, त्यांच्या या आकस्मिक मृत्यूमुळे मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

आणखी वाचा