मुंबई, दि. १३ : आयपीएल २०२६ मध्ये एका नव्या ताऱ्याचा उदय झाला असून विदर्भाचा युवा गोलंदाज Praful Hinge याने आपल्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. Sunrisers Hyderabad कडून खेळताना त्याने Rajasthan Royals विरुद्ध पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेत सामना अक्षरशः पालटून टाकला.
राजस्थानच्या डावाची सुरुवात होताच प्रफुल्ल हिंगेने आपल्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीने खळबळ उडवली. पहिल्याच चेंडूवर त्याने उदयोन्मुख सलामीवीर Vaibhav Suryavanshi याला शून्यावर बाद करत ‘गोल्डन डक’ दिला. या धक्क्यातून सावरायच्या आत त्याने यष्टिरक्षक फलंदाज Dhruv Jurel यालाही शून्यावर बोल्ड करत राजस्थानला दुहेरी धक्का दिला.
प्रफुल्ल इथेच थांबला नाही. आपल्या पहिल्याच षटकात त्याने आणखी एक फलंदाज बाद करत एकूण ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या पहिल्याच षटकात ३ बळी घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला असून त्याने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
https://www.instagram.com/prafulhinge_140?igsh=OW0xYWltcno4NTJq
२४ वर्षीय प्रफुल्ल हिंगे हा नागपूरचा रहिवासी असून विदर्भ संघाकडून तो देशांतर्गत क्रिकेट खेळतो. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएल संघांचे लक्ष वेधले होते. लिलावापूर्वी त्याला Mumbai Indians आणि Gujarat Titans यांसारख्या संघांनीही चाचणीसाठी बोलावले होते. मात्र त्याच्या गोलंदाजीतील विविधता आणि नियंत्रण पाहून हैदराबाद संघाने त्याला आपल्या ताफ्यात स्थान दिले.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही प्रफुल्लची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या असून त्याची सरासरी प्रभावी मानली जाते. तसेच विजय हजारे स्पर्धा जिंकणाऱ्या विदर्भ संघाचाही तो भाग होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याने आपली छाप पाडली आहे.
दरम्यान, प्रफुल्लच्या या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबाद संघाच्या शिबिरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. संघाच्या मालकीण Kavya Maran हिनेही स्टँडमध्ये उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
एकूणच, सहा चेंडूत सामना फिरवणाऱ्या या विदर्भाच्या मराठी गोलंदाजाने आयपीएलमध्ये दमदार एन्ट्री करत भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावण्याचे संकेत दिले आहेत.








