रत्नागिरी, दि. ०९ : गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. घराघरांत बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून, गणेशमूर्तींच्या कार्यशाळांमध्ये मूर्तिकार अहोरात्र मेहनत घेत आहेत. यंदा जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती गणेशमूर्ती, तर १२६ सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत.
कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा आणि उत्साह देशभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांत नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले हजारो चाकरमानी आपल्या मूळ गावी परततात. वर्षभर शहरांमध्ये धावपळीचे जीवन जगल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबीय आणि आप्तेष्टांसोबत काही दिवस घालवण्यासाठी चाकरमानी आवर्जून कोकणात येतात. त्यांच्या आगमनामुळे गणेशोत्सवाच्या काळात गावागावांत पुन्हा चैतन्य निर्माण होते.
यंदाही मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रवासाचे नियोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, एसटी महामंडळाकडूनही जादा बसफेऱ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय रत्नागिरीतील खासगी बससेवांसह परजिल्हे आणि परराज्यांतूनही मोठ्या प्रमाणात खासगी बसेस कोकणाकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ राहण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने महामार्गावरील टोलनाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे खासगी वाहनाने गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासाचा काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि विविध शासकीय विभागांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. उत्सव काळात वाहतूक सुरळीत ठेवणे, भाविकांची गैरसोय टाळणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देणे यासाठी नियोजन केले जात आहे. पोलीस, महसूल, आरोग्य, परिवहन, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
एका बाजूला घराघरांत सजावटीची तयारी सुरू असताना दुसरीकडे गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम वेगाने सुरू आहे. मूर्तिकारांकडून आकर्षक आणि पारंपरिक गणेशमूर्ती तयार केल्या जात असून, अनेक ठिकाणी मूर्तींचे रंगकाम आणि सजावटीचे अंतिम काम सुरू आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या फुलांची, पूजेच्या साहित्याची, सजावटीच्या वस्तूंची आणि विविध खाद्यपदार्थांची बाजारपेठही गजबजण्यास सुरुवात झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे, एसटी, खासगी बस आणि खासगी वाहनांची संख्या वाढणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
एकूणच, १ लाख ६९ हजारांहून अधिक घरगुती गणपती आणि १२६ सार्वजनिक मंडळांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह यंदाही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाच्या स्वागतासाठी अवघा रत्नागिरी जिल्हा सज्ज होत असून, चाकरमान्यांच्या आगमनाने कोकणातील गावागावांत पुन्हा उत्साह आणि चैतन्य निर्माण होणार आहे.








