रत्नागिरी, दि. १० : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या आणि परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर आणि सुरळीत प्रवासासाठी व्यापक तयारी केली आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्यात येणार असून, स्थानकांवर वैद्यकीय सुविधा, प्रवासी मदत केंद्रे, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या अतिरिक्त गर्दीसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने ०६५९१/०६५९२ यशवंतपूर-मडगाव जंक्शन-बेंगळुरू कॅन्ट विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०६५९१ यशवंतपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेस ११ सप्टेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता यशवंतपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी कुनीगल, चन्नरायपटणा, हसन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, काबकापुत्तूर, बंटवाळा, सुरत्कल, उडुपी, कुंदापूर, भटकळ, मुरुडेश्वर, होन्नावर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, काणकोण आदी स्थानकांवर थांबणार आहे.
परतीची ०६५९२ मडगाव-जंक्शन-बेंगळुरू कॅन्ट विशेष एक्स्प्रेस १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता बेंगळुरू कॅन्टला पोहोचेल. या गाडीचे आरक्षण ११ सप्टेंबरपासून प्रवासी आरक्षण प्रणाली, इंटरनेट तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. गाडीला वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य श्रेणीचे मिळून २० डबे असतील.
दरम्यान, गणेशोत्सव काळात उधना, विश्वामित्री, वलसाड, वडोदरा, नागपूर, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे, दिवा, पनवेल यांसह चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव आणि ठोकूरपर्यंत विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर १२ सप्टेंबरपासून प्रथमोपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. चिपळूण व रत्नागिरी येथील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध राहणार आहेत. प्रमुख स्थानकांवर आरोग्य तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी येथे २४ तास रेल्वे प्रवासी सहायता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. गर्दीच्या काळात विविध स्थानकांवर प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा क्षेत्रे तयार केली जाणार आहेत. स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल गाड्यांच्या आगमन-प्रस्थानाच्या वेळी सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गर्दी नियंत्रणासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्हीचे चोवीस तास निरीक्षण आणि रेल्वे सुरक्षा दलाची स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच कोकण रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या समन्वयातून पुढील प्रवासासाठी बससेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह वाढविण्यासाठी स्थानकांवर पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तू, फळे, फुले, काजू मोदक आदींचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे स्थानिक कलाकारांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भजने, जाखडी, संगीत कार्यक्रम, कठपुतळी प्रयोग आदी कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. याशिवाय सेल्फी पॉइंट, आकर्षक रांगोळी, विशेष विद्युत रोषणाई, ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी आणि तुतारी वादनातून प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे.
प्रवाशांनी स्वच्छता व शिस्त राखून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.








