गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; ३४ अतिरिक्त विशेष गाड्या, पनवेल-चिपळूण ३० मेमू फेऱ्या

नांदेड-सावंतवाडी विशेष रेल्वेलाही मंजुरी; रत्नागिरी, चिपळूणसह कोकणातील अनेक स्थानकांवर थांबा

रत्नागिरी, दि. ०९ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये आणखी ३४ विशेष गाड्यांची भर पडली असून, पनवेल-चिपळूण मार्गावर ३० अनारक्षित मेमू विशेष फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात येणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने यापूर्वी २६२ गणपती विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये २०० आरक्षित आणि ६२ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. सावंतवाडी रोडसाठी ११२, रत्नागिरीसाठी ६४ आणि मडगावसाठी २४ आरक्षित विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या विशेष रेल्वे सेवांसाठी आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती आहे.

नव्या नियोजनानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगावदरम्यान चार आरक्षित विशेष रेल्वे धावणार आहेत. या गाड्या १६ आणि १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता मडगावला पोहोचतील.

पनवेल-चिपळूण मेमूच्या ३० फेऱ्या

कोकणातील प्रवाशांसाठी पनवेल-चिपळूण मार्गावर अनारक्षित मेमू विशेष सेवाही सुरू करण्यात येणार आहेत. १० ते १४ सप्टेंबर तसेच १८ ते २७ सप्टेंबर या कालावधीत एकूण ३० फेऱ्या चालवण्यात येतील. पनवेलहून मेमू दुपारी ३.२० वाजता सुटून रात्री १०.२० वाजता चिपळूणला पोहोचेल. चिपळूणहून परतीची गाडी सकाळी ९ वाजता सुटून दुपारी २.३० वाजता पनवेलला पोहोचणार आहे.

नांदेड-सावंतवाडी विशेष रेल्वे

गणेशोत्सवातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनेही नांदेड-सावंतवाडी रोड विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०७६५९ नांदेड-सावंतवाडी रोड विशेष १२ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता नांदेडहून रवाना होईल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

परतीची गाडी क्रमांक ०७६६० सावंतवाडी रोड-नांदेड विशेष १४ आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता नांदेडला पोहोचेल.

या विशेष रेल्वेला पूर्णा जंक्शन, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येरशि, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि कुडाळ आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

या गाडीला एकूण २४ डबे असून त्यामध्ये २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान, ४ सामान्य आणि २ एसएलआर/डी डब्यांचा समावेश आहे. गाडी क्रमांक ०७६६० साठीचे आरक्षण १० सप्टेंबरपासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रे, इंटरनेट आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

अतिरिक्त विशेष गाड्या आणि मेमू सेवांमुळे नियमित रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

आणखी वाचा