रत्नागिरी, दि. १० सप्टेंबर : ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, स्वच्छ, आनंददायी आणि शिक्षणास पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील चार अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले. फिनोलेक्स कंपनीच्या ४५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या अंगणवाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या टप्प्यात गोळप आणि कोळंबे परिसरातील गोळप मोहल्ला (उर्दू माध्यम), कोळंबे येथील वाकीवाडी, मांडवकरवाडी आणि गोरीवलेवाडी या चार अंगणवाड्यांचा समावेश आहे.
नूतनीकरणाच्या कामांत इमारतीची आवश्यक दुरुस्ती, रंगकाम, बालकांना ज्ञानवर्धक माहिती देणाऱ्या ‘बोलक्या भिंती’, शैक्षणिक साहित्य तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना अधिक सुरक्षित आणि बालमैत्रीपूर्ण वातावरण मिळणार आहे. गोळप-दाभिळवाडी आणि कोळंबे-बागवाडी येथील आणखी दोन अंगणवाड्यांचे नूतनीकरणाचे कामही तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत रत्नागिरी परिसरातील आतापर्यंत एकूण १७ अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यापूर्वी फणसोप, रनपार, गोळप, पावस आणि कोळंबे परिसरातील १३ अंगणवाड्यांचे नूतनीकरण करून त्या बालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी ही बालविकासाची पहिली पायरी असल्याने सुसज्ज आणि आनंददायी वातावरणाचा बालकांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक व भावनिक विकासाला मोठा फायदा होतो. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुकुल माधव फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि अंगणवाडी सेविकांकडून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास आकाशवाणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे स्टेशन डायरेक्टर डॉ. सुनील गायकवाड, कार्यक्रम अधिकारी विवेक वानखेडे, सुहास नंदुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी केदार चव्हाण व संदीप पाटील, ॲड. गौरव महाजनी, ॲड. रुची महाजनी तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे रामबाबू संका, सागर चिवटे, नंदकुमार शिंपी, अमित घोरपडे, आशिष आठवले यांच्यासह स्थानिक सरपंच, अंगणवाडी सेविका, पालक, ग्रामस्थ आणि फाऊंडेशनचे शुभम भेगडे, शामराव निंबाळकर व वरद गोरे उपस्थित होते.








