राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ : अर्ज करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत

रत्नागिरी, दि. ९ (जिमाका) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि लोकोत्सवाचा गौरव करणाऱ्या ‘महागणेशोत्सव २०२६’ अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना येत्या ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय अशा विविध पातळ्यांवर सर्वोत्कृष्ट मंडळांची निवड करून त्यांना गौरवण्यात येणार आहे.

मूल्यांकनाचे निकष :
* पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट व विसर्जन पद्धती
* वर्षभरात राबविलेले समाजोपयोगी, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम
* मंडप परिसरातील स्वच्छता, शिस्त व सुरक्षेच्या उपाययोजना
* डिजिटल माध्यमांचा जनजागृतीसाठी सकारात्मक वापर
* नियमांचे पालन व पारदर्शक नियोजन

अर्ज प्रक्रिया :
इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ११ सप्टेंबर २०२६ पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी.
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा जपत पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा