रत्नागिरी, दि. ०१ (प्रतिनिधी): आजच्या बदलत्या काळात प्रमाणिकपणा शोधावा लागत आहे. विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मात्र जग कितीही बदलले असले तरीही प्रमाणिकपणा जिवंत आहे. हे रत्नागिरीतील खालची आळी येथील सोमनाथ रुणकर व त्यांची पत्नी सौ. गीता रुणकर यांनी दाखवून दिले आहे. जे. के.फाईल्स कंपनी जवळ भल्या पहाटे रिकामी रस्त्यावर पडलेली लाखो रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज असलेली पर्स त्यांनी मुंबई मधील कांदिवली येथे राहणार्या सौ. कालेकर यांना काही मिनिटातच परत केली. त्यामुळे रुणकर पती-पत्नीवर रत्नागिरीकरांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.
रत्नागिरी शहारातील खालची आळी येथे राहणारे श्री. सोमनाथ रुणकर हे दैनिक सागरमध्ये जाहिरात विभाग सांभाळतात. गेले अनेक वर्ष ते दैनिक सागरमध्ये ते कार्यरत आहेत. रविवारी पहाटे ते पत्नी सौ.गीता रुणकर यांच्यासह मुंबई येथे जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे कारने निघाले होते. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती. खालची आळी येथून ते रेल्वे स्थानकाकडे जाताताना जे.के. फाईल्स कंपनीच्या बाहेर मुख्य रस्त्यावर त्यांना एक पिशवी दिसली. त्यांनी कारचा वेग कमी करुन त्या पिशवी वरुन अलगद गाडी पुढे घेतली. मात्र कोणाची तरी महत्वाची पिशवी असेल यामुळे त्यांनी कार थांबवून पिशवी जवळ गेले. यावेळी ती पिशवी नसून पर्स असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
ती पर्स घेवून रुणकर पती-पत्नी कारमध्ये बसले. श्री.रुणकर यांच्या सुचनेवरुन सौ. गीता रुणकर यांनी आतमध्ये पर्स मालकाची ओळख दर्शविनारे कागदपत्र आहेत का ? याची तपासणी केली. यावेळी त्यांना एका महिलेचे आधार कार्ड दिसले. मात्र त्या आधार कार्डवरील असलेला मोबाईल क्रमांकावर फोन लागत नव्हता. त्यामुळे रुणकर दाम्पंत्याने रेल्वे स्थानकात जाऊन पोलीसांकडे पर्स देवून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. ते रेल्वे स्थानकाजवळ पोहचत असतानाच पर्समधील मोबाईलवर एक फोन आला. तो फोन तात्काळ श्री. रुणकर यांनी उचलला.
हॅलो……मी कालेकर ….बोलतेय, माझी पर्स तुम्हाला मिळाली आहे का ? या सौ. कालेकर यांच्या वाक्यावर होय असे श्री. रुणकर यांनी सांगताच त्या महिलेला मोठा दिलासा मिळाला. मोबाईलवरील संभाषणात श्री. रुणकर यांनी आपण रेल्वे स्थानकात जात असल्याचे सांगितले. पर्स शोधण्यासाठी रत्नागिरीकडे निघालेल्या सौ. कालेकर यांनी पुन्हा रेल्वे स्थानक गाठले. समोर उभ्या असलेल्या पती-पत्नीकडे आपली लाखो रुपयांचे दागिने असलेली पर्स दिसताच सौ. कालेकर यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पर्स हातात घेत रुणकर दाम्पंत्याचे पाय धरले. आयुष्यभराचे ऐवज यामध्ये होता. मंगळसूत्रासह अन्य सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे त्यामध्ये असल्याचे सौ.कालेकर यांनी सांगितले.
सौ.कालेकर या आंबेशेत येथील आपल्या नातेवाईकांकडे पालखी सोहोळयासाठी आल्या होत्या. सोहोळा अटपून रविवारी सकाळी त्या रेल्वेने मुंबईकडे जायला निघाल्या होत्या. आपली पर्स त्यांनी रिक्षाचा मागिल बाजूला ठेवली होती. रिक्षाच्या मागिल बाजूला कापड फटलेले असल्याने भरधाव वेगात पर्स रिक्षातून बाहेर पडली. त्यानंतर काही वेळाने या मार्गावरुन जाताना श्री. रुणकर व सौ. गीता रुणकर यांना ती पर्स रस्त्यात मिळाली. ती त्यांनी मुळ मालकाला परत केली. श्री.रुणकर दाम्पत्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केले जात आहे. सध्याच्या काळात प्रामाणिकपणा शोधून सापडत नाही, असे बोलले जाते. एखादी मोठी रक्कम हाती लागल्यास ती संबंधितांना परत दिल्याचे प्रसंगही दुर्मिळच. पण आजही माणुसकी, प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती रुणकर दाम्पत्याच्या कृत्यातून दिसून आहे.








