सावर्डे, दि. ०२ : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स डेरवण, सावर्डे या प्रशालेमध्ये दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी AI, ROBOTICS, IOT, CODING, AR अशा अत्याधुनिक अभ्यासक्रमाने युक्त असणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही विभागांच्या Robotics and Artificial Intelligence चे उद्घाटन राज्यसभेचे माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष मा. डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. Robotics and Artificial Intelligence लॅबच्या उद्घाटनाने संस्थेच्या STEM शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. SKAI Robotics चे डायरेक्टर श्री.अभिजित सहस्रबुद्धे आणि श्री.कृष्णमूर्ती यांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम इ. १ली ते १०वी करीता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरु करण्यात येत आहे.
Robotics and Artificial Intelligence लॅबच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना लॅब मध्ये उपलब्ध असणारी अत्याधुनिक उपकरणे जसे की विविध प्रकारचे रोबोट्स, थ्रीडी प्रिंटर, रोबोटिक किट्स, प्रगत संगणक प्रणाली, इत्यादींची सफर घडवण्यात आली. त्यानंतर शाळेमधील कार्यान्वित असणाऱ्या अटल टिंकरिंग लॅब, स्पेस लॅब आणि कला दालनाला डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांनी भेट दिली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि ग्रामीण भागात असूनही या शाळेच्या विकसित भारत बनविण्याच्या दूरदृष्टी बद्दल समाधान व्यक्त केले.
उद्घाटन सोहोळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. सोनाली जोशी यांनी प्रमुख पाहुणे डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांची ओळख करून दिली. प्रास्ताविकामध्ये शाळेच्या संचालिका सौ. शरयू यशवंतराव यांनी २६ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सक्षम करणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना व त्यातून साकारत गेलेली अत्याधुनिक शाळा हा प्रवास उलगडला. यानंतर SKAI Robotics चे डायरेक्टर श्री.कृष्णमूर्ती यांनी तंत्रज्ञान आणि नावीन्याच्या प्रवासात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या ए आय आणि रोबोटिक्स विषयी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी “झाडाची गोड फळे खायची असतील तर फळांवर लक्ष न ठेवता त्याच्या मुळांवर लक्ष देणे गरजेचे आहे” यासाठीच कोकणासारख्या भागात हा अभ्यासक्रम मराठी भाषेतूनही राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हे नमूद केले. स्वाध्याय पुस्तिकेचे अनावरणही प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धात्मक जगात वावरताना ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे हे गरजेचे असते आणि तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करणाऱ्या २१व्या शतकातील आव्हाने पेलणारे विद्यार्थी तयार करण्यासाठी Robotics and Artificial Intelligence लॅब निर्माण करीत आहोत असे मत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. विकासराव वालावलकर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी व पालक यांना संबोधताना मा. डॉ. विनयजी सहस्रबुद्धे म्हणाले, भाषा ही संस्कृतीची वाहक आहे, त्यामुळे आधुनिकतेशी नाते जोडताना भाषा ही तितकीच महत्त्वाची ठरते. परदेशी तंत्रज्ञान आपण स्वदेशीला अनुकूल करून घेतले पाहिजे, तसेच संगणकाशी मैत्री करताना ग्रंथांशी असणारे आपले नाते तोडू नये असे सांगून वाचनाचे महत्त्व याप्रसंगी व्यक्त केले. गुलजार साहेबांच्या किताबे या कवितेने सरांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेतील विविध विभागांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी खांडेकर यांनी केले व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता चाळके यांनी सर्वांचे आभार मानले. वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व उपक्रम पाहून डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांनी, “माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या PURA म्हणजेच ‘Provision of Urban Amenities to Rural Areas’ या संकल्पनेतील शाळा पाहून संस्मरणीय अनुभव मिळाला” असे आनंदाने व्यक्त केले.








