दापोली, दि. ०३ (प्रतिनिधी): आज दिनांक 03 सप्टेंबर रोजी जि. प. पूर्व प्राथमिक केंद्रशाळा येथे आगरवायंगणी व भोपण केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
भोपण व आगरवायंगणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची सुरुवात केंद्रप्रमुख प्राजक्ता मुरकर यांच्या हस्ते विद्येची देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रातील सर्वांना मदत करणारे जि.प. ओनणवसे-पाटील वाडी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदचे अध्यक्षस्थान शशिकांत देपोलकर यांनी भूषविले. केंद्र प्रमुख प्राजक्ता मुरकर, केंद्र मुख्याध्यापक अनंत झिमण, भोपण मुख्याध्यापक विनायक तिमसेकर, नवसे उर्दू प्रशाळेतील मुख्याध्यापक अजहर शेख आगरवायंगणी हायस्कूलचे शिक्षक सत्यवान दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश गुरव, ओनणवसे हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव माने भोपण व आगरवायंगणी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
त्यानंतर शिक्षक चेतन गोहने यांनी इयत्ता 4 थी च्या वर्गावर परिसर अभ्यास भाग 2 या विषयाचा आदर्श पाठ सादर केला. त्यानंतर ‘स्पोकन इंग्लिश’ या विषयावर अंगद ढाकणे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. छोटी-छोटी वाक्ये व गोष्टींमधून खूप सुंदर मार्गदर्शन केले.
यानंतर सर्वांनी भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. लगेच ‘डेडस्टाॅक’ या विषयावर शिक्षक संजय निवाते यांनी सुंदर मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ याविषयावर भोपण-पणदेरी शाळेच्या सौ. कारखेले व केंद्र मुख्याध्यापक अनंत झिमण यांनी मार्गदर्शन केले. रजा नियम मार्गदर्शन शिक्षक विनायक तिमसेकर तसेच प्रशासकीय मार्गदर्शन केंद्र प्रमुख प्राजक्ता मुरकर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात परिपत्रक वाचन करून परिपत्रकातील शंकांचे निरसन मुख्याध्यापक शशिकांत देपोलकर यांनी केले. शिक्षण परिषद व्यवस्थित पार पाडण्यासाठी मृदुला जोशी, आकांशा झिमण, जीवन धोपवकर आणि अनंत झिमण यांनी खूप परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन शिक्षिका मृदुला जोशी यांनी केले.








