मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

रत्नागिरी, दि. ०४ : मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार, २ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यमान शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नावनोंदणी व नाश्त्यानंतर माजी मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी पुष्पवर्षाव करून आजी-माजी शिक्षकांचे प्रेमपूर्वक स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आद्य संस्थापक कै. बाबासाहेब गावडे तसेच सरस्वती मातांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मुख्याध्यापिका अंजली पिलणकर यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत करताना शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सहाय्यक शिक्षक सचिन मिरगल यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला, तर संतोष गार्डी यांनी मागील मेळाव्याचा हिशोब मांडला.

‘मी असा घडलो’ या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी रणजीत सुवारे यांनी शालेय जीवनातील संस्कारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालक अभिजीत गोडबोले यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत शाळेबद्दलची आपुलकी व्यक्त केली व मदतीचे आश्वासन दिले. याशिवाय सनम देसाई व अविनाश बाईत यांनीही आपल्या आठवणी सांगत शाळेला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

माजी मुख्याध्यापक अशोक पाखरे, प्रज्ञा दळी, स्नेहल मंद्रुपकर तसेच डॉ. राजीव सप्रे यांनी मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक केले. मेळाव्यास अनेक माजी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून सर्वांना नियोजनपूर्वक सहभागी होता येईल.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य रणजीत सुवारे, सुदेश निवळकर, अभिजीत गोडबोले, योगेश कोरगावकर, आकाश परीट, प्रणित मेस्त्री, अनिकेत जाधव, अच्युत गजबीये, आलीशा जाधव, रिया मांडवकर, शाकिब मुल्ला, ऋत्विक मोरे, सुशांत पवार, सनम देसाई, अक्षय पाखरे, जीवन जाधव यांच्यासह जयसिंग लोहार, वृषाली सावंत आणि शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. प्रशालेतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.

आणखी वाचा