जागतिक ख्यातीचे व्यावसायिक चित्रकार प्रमोद दिक्षित यांचे पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सोमवारी चित्रप्रदर्शन

पोलादपूर, दि. १४ (शैलेश पालकर)- कमर्शियल आर्टसमध्ये जागतिक ख्याती प्राप्त चित्रकार आणि पोलादपूरचे सुपुत्र प्रमोद दिक्षित यांच्या वैविध्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीगणेशासमोरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये येत्या सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

जागतिक स्तरावरील जाहिरात कंपन्यांच्या मागणीनुसार चित्राद्वारे संकल्पना सादर करणाऱ्या प्रमोद दिक्षित यांना गेल्या काही वर्षांपासून पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण जनजीवनाने घातलेली भुरळ त्यांच्या अनेक चित्रकृतींद्वारे स्पष्ट होत असून पंतप्रधान मोदी यांचा हात धरून राममंदिरामध्ये जाणारे पाठमोरे श्रीरामलल्ला चेहऱ्याने कसे दिसत असावेत हा कल्पनाविष्कार प्रमोद दिक्षित यांच्या कुंचल्यातून अप्रतिमपणे साकारला गेला आहे. चित्रकलाप्रेमींसह सर्वांनीच जागतिक ख्यातीचे चित्रकार प्रमोद दिक्षित यांचा कलाविष्कार पाहण्यासाठी आवर्जून चित्रप्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमरदीप नगरकर यांनी केले आहे.

गृहरक्षकदलात रायगड जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या अनंत दिक्षित या प्राथमिक शिक्षकांचे द्वितीय पुत्र असलेल्या प्रमोद दिक्षित यांच्यातील तालुका व जिल्हा पातळीवर सर्वप्रथम क्रमांकाचे चित्र साकारण्याचे चित्रकलागुण ओळखून अनंत दिक्षित यांनी प्रमोद दिक्षित यांना जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमध्ये दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी पाठविले.  पोलादपूर तालुक्यातील परसुले येथे जन्म आणि साखर येथे शिक्षण सातवीपर्यंत घेतल्यानंतर आठवी ते दहावी पोलादपूर येथे शिक्षण घेतलेल्या प्रमोद दिक्षितांना ग्रामीण भागातील आणि शहरीभागातील शिक्षण पध्दतीतील फरक वेळोवेळी जाणवत असताना पहिल्या वर्षी फाऊंडेशन कोर्स करताना राज्यात सातवा क्रमांक पटकविल्यानंतर पुढील चारही वर्षी प्रमोद दिक्षितांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी प्रत्येक वर्षी पहिला क्रमांक प्राप्त करीत शेवटच्या वर्षी फर्स्टक्लास फर्स्ट क्रमांक प्राप्त करताना आपले चित्रकौशल्य सिध्द केले. यानंतर मुंबईतील टॉपटेन जाहिरात कंपन्यांमध्ये एवरेस्ट या कंपनीने कॉल केले आणि तेथे तब्बल 10 वर्षे काम केले. इलस्ट्रेटर हे जाहिरातीतील चित्रासंदर्भातील नोकरीचे पद असूनही अनेक कंपन्यांचे जाहिरातविषयक काम केले तर आर्थिक आवक चांगले राहिल या विचाराने प्रमोद दिक्षितांनी स्वत:चे ऑफिस सुरू करून फ्रि लान्स इलस्ट्रेटर म्हणून अनेक जाहिरात कंपन्यांकडून कामे आणून त्यांच्या संकल्पनेनुसार चित्र रेखाटून त्यांना देण्याचे सत्र तब्बल 22 वर्षे सुरू ठेवले.

याकाळात, जर्मनीतील लिंटास कंपनीसह अनेक आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपन्यांनी प्रमोद दिक्षितांकडून असंख्य कलाकृती रेखाटून घेतल्या आणि त्या संपूर्ण जगभर प्रसिध्द पावल्या. मात्र, फक्त जाहिरात कंपन्यांच्या क्षेत्रात मागणीनुसार चित्रकलेचा आविष्कार सादर करणाऱ्या प्रमोद दिक्षितांना स्वत:च्या चित्रांचे कलादालन असावे, अशी मनोमन इच्छा होती. अशातच, मोठे बंधू राजाभाऊ दिक्षित यांनी सावित्री नदीपात्रालगत महाबळेश्वर रस्त्यावरील एक जमीन खरेदी करण्यास सुचविल्यानंतर प्रमोद दिक्षितांनी गावाकडे येण्याची ओढ असल्याने तात्काळ ती जमिन घेऊन तेथे स्वत:चे निवासस्थान उभारले आणि त्यासोबतच चित्रदालनाचा कक्ष निर्माण करून स्वत:चा वर्कशॉपदेखील तयार केला. याचदरम्यान, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांनी राहण्या-जेवण्यासाठीची सोय होईल काय, अशी विचारणा घराच्या दारावर येऊन सातत्याने केल्याने निवासस्थानाचे रूपांतर पर्यटकांच्या निवास भोजनाच्या सुविधेसाठी ‘पिकनिक स्पॉट’ असे केले. मात्र, या नवीन व्यवसायात पदार्पण करताना स्वत:च्या चित्रकला दालनात चित्र नसल्याची खंत प्रमोद दिक्षितांना सतावत होती. अशातच, त्यांनी पुन्हा हातात ब्रश आणि रंग धरून स्वत:ला वर्कशॉपमध्ये चित्रनिर्मितीसाठी दिवसेंदिवस बंद करून घेत शेकडो चित्रकृती रेखाटल्या. स्ट्रोक्स आणि मास्टरस्ट्रोक्स असे ब्रशचे फर्राटे पांढऱ्या कागदावर वेगवेगळी चित्रं जिवंतपणे साकारू लागली.

ग्रामीण जनजीवनाचे यथार्थ चित्रण करणाऱ्या प्रमोद दिक्षितांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी सैनिक, फडप्रमुख आजरेकर महाराज, आईमुल, गुरे चरायला सोडून मोबाईल बघणारी युवती,करवंद बोरं जांभळं फणसाचे गरे विकायला बसलेली महिला, पहाटे अंगण शेणाने सारवणारी महिला, तांदूळ पाखडणारी गृहिणी, कपडे आपटून धुणारी महिला, विचारमग्न पुरूष, स्नान करणारी तरूणी, केशरी व काळया रंगात साकारलेली अंबाडयात वेणी माळणारी महिला, मासेमारी करणारा बालक, डोक्यावर ओझे घेऊन हातात काठी धरलेली महिला, वाहत्या पाण्यात पाय आपटून आनंदीत झालेली तरूणी, तीरकमठा हाती धरलेला आदिवासी, पावा वाजविणारा गुराखी, बाळाला पाजणारी आई, पारंब्या आणि वटवृक्ष, कमळ काढण्यासाठी तलावात झुकलेली तरूणी, नांगरणी करणारा शेतकरी, चुलीसाठी लाकडे गोळा करणारी महिला, वृध्द, बालक, बालिका, तरूणी, विविध पक्षी, पशू, वाहने, कुडपणची भीमाची काठी आणि छोटी कौलारू घरे, ग्रामीण बालक्रिडांची दृश्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, कमळ, संध्याकाळ, मधमाश्यांचे घोंगावणे, नंदी, मंदिर, गणपती, श्रीकृष्ण, लीओ नार्दो द व्हिन्सीच्या कलाकृतींसारखी मराठमोळी दृश्य अशी अनेक चित्रं जलरंगातून साकारली आहेत.

सोमवारी प्रमोद अनंत दिक्षित या पोलादपूरच्या भुमिपुत्राची जागतिक स्तरावरील चित्रकला तालुक्यातील जनतेसाठी खुल्या प्रदर्शनातून पाहण्याची पर्वणी उपलब्ध झाली आहे.

आणखी वाचा