रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत जिल्हा परिषद, रत्नागिरीचे शाळांकरीता १०० संगणक संच

रत्नागिरी, दि. २६ : जिल्हा परिषद शाळांतील मुलांना संगणक विषयाचे अद्यावत ज्ञान मिळावे, याकरिता जिल्हा परिषदेनं एक उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाचच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून विंडोज ऑपरेटींग सिस्टीमसह १०० संगणक संच उपलब्ध करून मिळावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे करण्यात आली होती.

याबाबत दि.२१.१२.२०२३ रोजी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळामध्ये तात्काळ निर्णय घेवून २ टप्प्यांत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांकरिता संगणक संच देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतात.

या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने संगणक संच घेणे शक्य नसल्याने, विद्यार्थ्यांची गरज तसेच संगणकाचा त्यांच्या भविष्यकाळात होणारा उपयोग या बाबी विचारांत घेवून रत्नागिरी जिल्हा बँकेने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना १०० संगणक संच देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापुर्वी दि.२९.०२.२०२४ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी हनुमंत सुर्वे व उपमुख्य लेखाधिकारी संजय कांबळे यांचेकडे ५० संगणक संच सुपूर्द करणेत आले होते.

उर्वरित ५० संगणक संचांचा वितरण कार्यक्रम दि.२४.०९.२०२४ रोजी बँकेचे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.

सदर संगणक संचांचे वितरण बँकेचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव, तसेच उपस्थित संचालक डॉ. जयवंत जालगांवकर, अॅड. दिपक पटवर्धन,  संजय रेडीज, मधुकर टिळेकर, राजेंद्र सुर्वे, डॉ. अनिल जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांचे हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी हनुमंत सुर्वे व उपमुख्य लेखाधिकारी संजय कांबळे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

आज जिल्हा बँकेने जिल्हा परिषद शाळांना १०० संगणक संच पुरविण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला. याबद्दल बँकेच्या या स्तुत्य सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी यांनी त्यांचे आभार मनोगतामध्ये बँकेने पुढाकार घेवून रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब मुलांकरीता संगणकाचे ज्ञान मिळावे याकरिता तात्काळ निर्णय घेवून १०० संगणक संच पुरविले याबद्दल आभार व्यक्त केले.

तसेच बँकेने नवनिर्माण शिक्षण संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रसिध्द होणाऱ्या स्मरणिकेकरीता जाहिरात स्वरूपात आर्थिक सहाय्य करून नवनिर्माण संस्थेमार्फत वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, याकरीता चालविलेल्या चळवळीला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत नेहमीच जिल्ह्यातील स्तुत्य उपक्रमांना सहकार्य केले जाते, तसेच आपत्तीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

आणखी वाचा