संगमेश्वर , ता. ९ : शिवणे (मयूर बाग) ते नांदळज फाटा दरम्यानचा 6 किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2022 मध्ये मंजूर होऊन त्यापैकी केवळ 3.5 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. उर्वरित 2.5 किलोमीटरचा रस्ता अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या अपूर्ण रस्त्यामुळे पालक, विद्यार्थी, वृद्ध नागरिक यांना दररोज त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होते.
ग्रामपंचायत शिवणे व ग्रामस्थ यांच्या वतीने दिनांक 11 जून रोजी तहसील कार्यालय, देवरुख येथे उपोषण करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतचे सरपंच राजू पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात वेळोवेळी निवेदने दिली असून, अजूनही निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे राजू पवार यांनी सांगितले.खराब रस्त्यामुळे वाहने गावात येत नाहीत.आजारी माणसाला दवाखान्यात नेताना अडथळे येतात असेही पवार यांनी सांगितले.लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची मागणी पवार यांनी केली आहे.