कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण : आमदार संजय गायकवाड अडचणीत

मुंबई, दि. ९ (क्षितिज कदम): आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण मिळाल्याचा आरोप करत शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने विधान परिषदेच्या सभागृहातही जोरदार पडसाद उमटवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे याप्रकरणी कारवाईची शिफारस केली असून, गायकवाड यांच्यावर निलंबनाची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारात आमदार गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये मिळालेल्या डाळ-भाताबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्याशी वाद घातला आणि संतापाच्या भरात त्याला मारहाण केल्याचे समोर आले. या प्रकाराचे व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित करत गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “बनियान-टॉवेलवर फिरणारे आमदार जर गरीब कर्मचाऱ्याला मारहाण करणार असतील, तर अशा लोकांच्या पाठिंब्यावर सरकार चालवायचं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
परब यांनी या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला धक्का बसतो, असा इशाराही दिला. त्यांनी सभागृहात जाहीरपणे सांगितलं की, “जर विधिमंडळाच्या कार्यकक्षेत मारहाण केली गेली, तर निलंबन ठरलेलं असतं. मग गायकवाड यांच्यावरही तोच नियम लागू होतो.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत, “अशा प्रकाराचे वर्तन निंदनीय आहे. निकृष्ट जेवण असेल तर तक्रार केली जाऊ शकते, पण मारहाण करणे हा योग्य मार्ग नाही. यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. सभापती आणि अध्यक्षांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी,” असे म्हणत अधिकृतपणे शिफारस नोंदवली.
दरम्यान, या प्रकरणामुळे संजय गायकवाड अडचणीत आले असून, यापुढे शिस्तभंगाची कारवाई किंवा निलंबन होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी संघटनांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, आमदाराचे वर्तन निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे.
विधानभवन परिसरात अशा घटना घडणं ही लोकशाही मूल्यांवर गालबोट आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली असून, पुढील काळात सभापतींच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे.

आणखी वाचा