श्रवणदोष असणाऱ्यांसाठी रत्नागिरीत मोफत मार्गदर्शन शिबिर

रत्नागिरी, दि. १७ : डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई (मुंबई) आणि आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवण व वाचा दोष असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींकरिता मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २० जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत आस्था थेरपी सेंटर, परकार हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे होणार आहे.
या शिबिरात जन्मतः अथवा नंतर ऐकण्यात वा बोलण्यात अडचण निर्माण झालेल्या बालकांसह प्रौढ व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. तसेच, त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय व थेरपी सेवांबाबत मार्गदर्शन दिले जाईल. विशेष म्हणजे OAE, BERA, PTA या आधुनिक तपासण्या ‘ना नफा – ना तोटा’ तत्वावर करण्यात येणार आहेत.
या शिबिरात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण आणि ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मुलांच्या पालकांनी त्यांच्या पूर्वीच्या तपासणी अहवालांसह शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे प्रमुख समन्वयक आणि स्पीच थेरपिस्ट संकेत चाळके यांनी या शिबिराबाबत माहिती दिली. ग्रामीण भागातील कोणतेही बालक योग्य निदानाअभावी मुख्य प्रवाहापासून दूर राहू नये, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आस्थाच्या सचिव व प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि डॉक्टरांनी या माहितीचा प्रसार करून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ती पोहोचवावी, असे आवाहन केले आहे.
या शिबिरासाठी पालकांनी १० ते ६ या वेळेत ७०४५४५२४२४ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी.

आणखी वाचा