अहमदाबाद विमान अपघातातील गंभीर चूक; १२ कुटुंबांना दिले गेले ‘चुकीचे’ मृतदेह

मुंबई, दि. २३ : १२ जून २०२५ रोजी दुपारी अहमदाबादमध्ये घडलेली एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली होती. या अपघातात २३० प्रवासी, दोन पायलट्स आणि १० केबिन क्रू सदस्यांसह एकूण २७० जणांचा मृत्यू झाला होता. विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळल्याने स्थानिक विद्यार्थी डॉक्टर्ससुद्धा या अपघातात बळी गेले. या घटनेनंतर देशभर शोककळा पसरली होती.
या दुर्घटनेचा परिणाम एवढा भीषण होता की बऱ्याच प्रवाशांचे मृतदेह पूर्णतः जळून गेले होते. काहींचे अवशेषही सापडले नाहीत. त्यामुळे कोणताही मृतदेह नक्की कोणाचा, हे ओळखणे अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत मृतांच्या ओळखीची खात्री करण्यासाठी आणि मृतदेह कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घेतला गेला.
मात्र या प्रक्रियेतही मोठी चूक झाल्याचे आता समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, विमानात एकूण १६९ भारतीय नागरिकांसह ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होते. या अपघातानंतर ब्रिटिश नागरिकांचे मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्यात आले. लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी त्वरित अंत्यसंस्कार करण्याआधी स्वखर्चाने पुन्हा एकदा डीएनए तपासणी केली. आणि या तपासणीतून एक धक्कादायक सत्य समोर आले — १२ मृतांचे मृतदेह चुकीच्या कुटुंबांना देण्यात आले होते.
ही बाब समोर आल्यानंतर संबंधित कुटुंबीयांमध्ये प्रचंड संताप व दु:खाची लाट उसळली आहे. मृतदेह ओळखण्याच्या प्रक्रियेत इतकी गंभीर चूक होणे हे मानवी संवेदनेच्या दृष्टीने असह्य आहे. या प्रकरणामुळे अनेक कुटुंबांना आपल्या प्रियजनांचा अंतिम निरोप घेण्याचा हक्क गमवावा लागला. काहींनी आधीच अंत्यसंस्कार उरकले होते, मात्र जेव्हा समजले की दिलेला मृतदेह त्यांच्या नातेवाइकाचाच नाही, तेव्हा त्यांच्यावर आणखी एक मानसिक आघात झाला. अनेकांनी आपल्या कार्यक्रम रद्द केल्याची माहितीही पुढे आली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेतील ढिसाळपणा आणि निष्काळजीपणामुळे केंद्र सरकार आणि एअर इंडिया या दोघांवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विविध देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून, काही कुटुंबांनी न्यायालयात धाव घेण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, भारतातील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या घटनेची दखल घेतली असून, नव्याने डीएनए सॅम्पलची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अपघातानंतर मृतदेह ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालींमध्ये सुधारणा करण्याबाबत गंभीर विचार सुरु असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या दुर्घटनेनंतर मृतदेह ओळखण्यासाठी केवळ डीएनएचाच एकमेव आधार असल्याने, त्याची अचूकता आणि प्रक्रिया किती जबाबदारीने हाताळली जाते, यावर संपूर्ण यंत्रणेची विश्वासार्हता अवलंबून असते. मात्र या घटनेमुळे त्या विश्वासाला मोठा धक्का बसला आहे.
ज्यांना मृतदेह मिळालेच नाहीत, किंवा चुकीचा मृतदेह मिळाला, त्यांच्यासाठी हा केवळ एक प्रशासनिक अपघात नाही, तर भावनिक, मानसिक आणि धार्मिक श्रद्धांवर झालेला आघात आहे.
देशव्यापी संतापाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लवकरच याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची शक्यता आहे. त्या अहवालातून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल की नाही, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा