गुहागरात ठाकरे गटाला मोठा धक्का : माजी जि.प. सदस्या नेत्रा ठाकुर शिंदे शिवसेनेत दाखल होणार

गुहागर, दि. २६ (प्रतिनिधी): गुहागर तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवत ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जि.प. माजी सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर या उद्या, २७ जुलै रोजी शिंदे शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी ३ वाजता हेदवतड येथील मच्छीमार समाज सभागृहात पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
नेत्रा ठाकुर या गुहागरातील राजकीय वर्तुळात भास्कर जाधव यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे त्यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाचे स्थान तालुक्यात डळमळीत होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटातील आणखी काही दिग्गजही शिंदेसेनेत
नेत्रा ठाकुर यांच्या सोबत ठाकरे गटातील अजून चार मोठे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यात माजी सभापती विलास वाघे, माजी सभापती पूनम पाष्टे, माजी सभापती दत्ताराम निकम तसेच विभागप्रमुख समीर डिंगणकर यांच्या नावांचा समावेश असून, हे सर्व जण उद्याच्या कार्यक्रमात धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
लोकभावना आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा – नेत्रा ठाकुर
आपल्या गटातील कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा सूर ओळखूनच हा निर्णय घेतल्याचे नेत्रा ठाकुर यांनी स्पष्ट केले. “आमच्या गटातले कार्यकर्ते शिंदे साहेबांच्या भूमिकांशी सहमत असून, विकासाचा वेग शिंदे गटातून अधिक असेल असा विश्वास वाटतो. त्यामुळे हा प्रवेश केवळ राजकीय नव्हे, तर विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच या निर्णयाची माहिती आमदार भास्कर जाधव यांना पूर्वीच दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली गतिमान
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागलेली असताना अशा घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवार राजेश बेंडल यांना तालुक्यातून आघाडी मिळाली होती. त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तालुक्यात शिंदे गट आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. नेत्रा ठाकुर यांचा प्रवेश यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
ठाकरे गटात चिंतेचे वातावरण
या घडामोडींमुळे ठाकरे गटामध्ये अस्वस्थता पसरली असून, अंतर्गत चाचपणी व समजुतीच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. विशेषतः वेळणेश्वर गटात ठाकुर दाम्पत्याचा प्रभाव लक्षात घेता, ही गळती थोपवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
गुहागर तालुक्यातील राजकारणात यामुळे नवा भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे निष्ठावान मानले जाणारे नेते आणि कार्यकर्तेच आता दुसऱ्या बाजूला वळू लागल्याने शिंदे गटाचा तालुक्यात दबदबा वाढण्याची चिन्हं आहेत.

आणखी वाचा