चिपळूणमध्ये पहिल्यांदाच ‘ब्लॅक हेरॉन’चे दर्शन; भारतीय पक्षी इतिहासात ऐतिहासिक नोंद

चिपळूण, दि. ५ (प्रतिनिधी) : कोकणच्या निसर्गरम्य आणि जैवविविधतेने नटलेल्या चिपळूणमध्ये एका दुर्मिळ आणि थक्क करणाऱ्या पक्ष्याचे दर्शन झाल्याने संपूर्ण पक्षी निरीक्षक समुदायात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. भारतात आजवर नोंद न झालेला आफ्रिकन ‘ब्लॅक हेरॉन’ (Black Heron – Egretta ardesiaca) हा अत्यंत दुर्मिळ पक्षी प्रथमच चिपळूणमध्ये दिसून आला असून, हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
हा दुर्मीळ पक्षी चिपळूणच्या परिसरातील पाणथळ भागात मासेमारी करताना आढळून आला. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक डॉ. श्रीधर जोशी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात या दोन काळसर बगळ्यांचे फोटो टिपले आणि त्यांचे निरीक्षण करतांना लक्षात आले की हे पक्षी एक विशिष्ट आणि अत्यंत दुर्मिळ पद्धतीने – ‘कॅनोपी फीडिंग’ – मासे पकडत होते. या पद्धतीत हे पक्षी आपले पंख छत्रीसारखे पसरवतात आणि त्याखाली सावली निर्माण करून मास्यांना आकर्षित करतात. ही शैली फक्त ब्लॅक हेरॉन या पक्ष्यात आढळते.
या निरीक्षणाच्या आधारे डॉ. जोशी यांनी त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधून या पक्ष्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. प्रारंभी काही संशोधकांनी याला ‘ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन’ मानले होते, परंतु शारीरिक वैशिष्ट्ये आणि मासेमारीची पद्धत लक्षात घेत, अखेरीस हे ‘ब्लॅक हेरॉन’च असल्याचे निश्चित करण्यात आले.
हा पक्षी मूळचा आफ्रिकेतील असून सेनेगल, सुदान, केनिया, टांझानिया, मादागास्कर आणि दक्षिण आफ्रिकेच्या भागांमध्ये आढळतो. तो स्थलांतर करणारा पक्षी नसल्याने भारतात त्याचे आगमन हे अत्यंत दुर्मीळ आणि अभ्यासाच्या दृष्टीने अनपेक्षित आहे. डॉ. जोशी यांनी या पक्ष्याच्या छायाचित्रांची आणि तपशीलांची नोंद इंडियन बर्ड जर्नलमध्ये पाठवली असून भारतातील अधिकृत नोंदीत त्याची भर पडण्याची शक्यता आहे.
डॉ. जोशी म्हणाले, “या पक्ष्यांनी भारतात, तेही चिपळूणसारख्या छोट्या भागात हजेरी लावणं हे आश्चर्यकारक आहे. हे आगमन केवळ पक्षीनिरीक्षकांसाठी नव्हे, तर संपूर्ण जैवविविधतेच्या अभ्यासासाठी एक नवा अध्याय उघडणारे आहे. या प्रकारची नोंद चिपळूण शहराला जागतिक पक्षी नकाशावर स्थान देऊ शकते.”
ब्लॅक हेरॉनचे हे आगमन हे चिपळूण परिसराच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी, तसेच पक्षीनिरीक्षण पर्यटनासाठी एक नवा अध्याय सुरू करणारे ठरणार आहे. यामुळेच कोकणच्या निसर्गरम्य भूमीत जैवविविधतेचा अधिक व्यापक अभ्यास आणि संवर्धन करण्यासाठी नवे दार खुले झाले आहे.

आणखी वाचा