मुंबई | रत्नागिरी | प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलावगण, कोळीसरे या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक गावांवर प्रस्तावित MIDC प्रकल्पाचे धोक्याचे ढग अधिकच गडद होत चालले आहेत. शासनाकडून सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाच्या हालचालींविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एकजुटीने तीव्र विरोधाचा पवित्रा घेतला असून, हा आवाज आता केवळ कोकणपुरता मर्यादित न राहता थेट मुंबईत धडकला आहे.
अस्तित्वाच्या लढ्यासाठी आंदोलनाचे रणशिंग
या प्रकल्पाविरोधात उभा राहिलेला लढा फक्त जमिनीपुरता मर्यादित नसून, तो गावांचे अस्तित्व, सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक परिसंस्थेच्या रक्षणाचा लढा असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. ३ ऑगस्ट रोजी दादर येथील पर्ल सेंटरमध्ये आयोजित आढावा बैठकीत या लढ्याची पुढील रणनिती आखण्यात आली. बैठकीस संघर्ष कृती समितीचे प्रमुख प्रथमेश गोपाळ गावणकर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे, नंदकिशोर आग्रे, ओमकार शितप यांच्यासह मुंबईतील कोकणवासीय आणि संबंधित गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाम भूमिका : अधिसूचना रद्द होईपर्यंत माघार नाही
या बैठकीत एकमुखी ठराव पारित करत, “जोपर्यंत शासन प्रस्तावित MIDC प्रकल्पासाठी जारी केलेली अधिसूचना रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम निर्णय घेण्यात आला. आगामी काळात दादर येथे हजारोंच्या उपस्थितीत निदर्शने, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ आणि मानवाधिकार विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जनसंवाद सभा घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची भेट घेणार
प्रकल्पविरोधातील आवाज अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी संघर्ष समितीचे शिष्टमंडळ लवकरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. स्थानिक जनतेच्या भावना, मागण्या आणि पर्यायी विकासाच्या कल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. या आंदोलनाकडे शासनाने आणि प्रशासनाने जर दुर्लक्ष केल्यास, बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.
“विकास आमच्या अटींवर हवा, जबरदस्ती नको”
गावकरी, शेतकरी आणि स्थानिक तरुणांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडताना सांगितले, “विकास हवा, पण आमच्या अटींवर. आमच्या जमिनी बळकावून नव्हे, तर आम्हाला केंद्रस्थानी ठेवूनच कुठलाही प्रकल्प हवा.” त्यांनी शेतीपूरक, पर्यावरणस्नेही, पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांवर सहकार्याची तयारी दर्शवली; मात्र MIDC सारख्या उद्योगविस्तार प्रकल्पामुळे होणाऱ्या सामाजिक-परिसंस्थेच्या हानीला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कोकणच्या भविष्यासाठी निर्णायक संघर्ष
संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की, “वाटद MIDC प्रकल्पाविरोधातील संघर्ष हा केवळ स्थानिक प्रश्न नाही, तर संपूर्ण कोकणच्या पर्यावरण, संस्कृती आणि भविष्याशी निगडित आहे.” त्यामुळे पुढील काही दिवसांत या आंदोलनाला केवळ वेगच नव्हे, तर व्यापक लोकसहभागाचे रूप प्राप्त होणार असल्याचे संकेत दिले.
वाटद MIDC प्रकल्पाविरोधात उभा राहिलेला हा लढा कोकणच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने नवे पर्व ठरू शकतो. ग्रामीण जनतेचा आवाज, मुंबईसारख्या महानगरात ठसठशीतपणे उमटू लागल्याने आता शासन आणि प्रशासनावर या प्रकल्पाच्या पुनर्विचारासाठी दबाव वाढू लागला आहे. गावांचे अस्तित्व, संस्कृती आणि पर्यावरण या त्रिसूत्रीच्या रक्षणासाठी उभारलेले हे आंदोलन कोकणासाठी एक निर्णायक वळण ठरू शकते.