चिपळूण, दि. ०७ : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धामणवणे खोतवाडी येथे जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय ६३) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी अत्यंत संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत.
मृतदेह घरातच पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे हा घातपात असून, त्यांच्या खुनाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं असून, प्राथमिक तपासात श्वान थेट धामणवणे रस्त्याने डोंगराकडील एका फार्महाऊसकडे गेले. त्यामुळे मारेकरी जंगलाच्या दिशेने पळाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वर्षा जोशी यांची पार्श्वभूमी मूळच्या गोंधळे येथील वर्षा वासुदेव जोशी या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. सहा वर्षांपूर्वी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या पतीचे निधन २०११ साली झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्या चिपळूण तालुक्यातील धामणवणे खोतवाडी येथील त्यांच्या घरी एकट्याच राहत होत्या.
गुरुवारी त्या आपल्या मैत्रिणींसह हैद्राबादजवळील विठापूर येथे सहलीसाठी जाणार होत्या. सर्व तयारी पूर्ण झालेली असून बुधवारी रात्रीपर्यंत त्या सतत संपर्कात होत्या. मात्र बुधवारी रात्रीपासून त्यांचा फोन बंद होता आणि कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
मैत्रिणींची शंका आणि भयानक उलगडा वर्षा जोशी यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या मैत्रीण तोरस्कर यांनी वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारी शिरीष चौधरी यांना फोन करून पाहण्यास सांगितले. चौधरी आणि सरपंचांनी मिळून घराची पाहणी केली असता, पुढील दरवाजा आतून बंद होता, तर मागील दरवाजा उघडा आढळला.
शेजारी घरात शिरले आणि त्यांनी जो प्रकार पाहिला, तो अंगावर शहारे आणणारा होता. वर्षा जोशी यांचा मृतदेह घरातच पडलेला होता, पाय बांधलेले होते आणि खोलीतील वस्तूंचा अवकाश ढवळून काढलेला होता. यावरून घरात झटापटीची चिन्हंही दिसत होती.
पोलीस तपासाला वेग चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक पथक, ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाची मदत घेतली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. सध्या एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे, मात्र अद्याप कुठल्याही अटकबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पोलीस अधिकारी यांनी सांगितलं की, “घटना अत्यंत गंभीर आहे. आमच्याकडे काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. यामध्ये जवळच्या व्यक्तीचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
समाजमन सुन्न वर्षा जोशी या सामाजिकदृष्ट्या सक्रिय, शांत स्वभावाच्या आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या हत्येने गोंधळे व धामणवणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या सहकाऱ्यांपासून ते शेजाऱ्यांपर्यंत सर्वजण या घटनेने स्तब्ध आहेत.
खून की घरफोडी? घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन शक्यता पोलिस तपासात पुढे येत आहेत. एक म्हणजे घरात चोरी किंवा लुटीच्या उद्देशाने कोणी घुसलं आणि झटापटीदरम्यान वर्षा जोशी यांचा मृत्यू झाला. दुसरी शक्यता म्हणजे वैयक्तिक वैमनस्य वा ओळखीतील व्यक्तीचाच सहभाग. पाय बांधून ठेवणं, मागच्या दरवाज्याचा वापर, आणि मोबाइलचा अचानक बंद होणं यावरून कटकारस्थानाची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे.
अन् शिक्षिकेच्या घरात सध्या केवळ मृत शांतता… हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या शिक्षिकेचं आयुष्य अशा भयावह प्रकारे संपणं समाजासाठी मोठा धक्का आहे. पोलिसांच्या तपासातून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.