‘हर घर तिरंगा’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा – अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांचे निर्देश

रत्नागिरी, ७ ऑगस्ट | प्रतिनिधी : देशभक्तीचा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचवणारी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम गेल्या तीन वर्षांत एक लोकचळवळ बनली असून, यंदाही ती अधिक जोमाने राबवावी, असे स्पष्ट निर्देश अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित बैठकीत ही सूचना देण्यात आली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह विविध विभागप्रमुख, आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदार सहभागी झाले होते.
तीन टप्प्यांतील नियोजन
अपर जिल्हाधिकारी गलांडे यांनी सांगितले की, शासनाने यावर्षी मोहिमेसाठी तीन टप्पे निश्चित केले आहेत –
  1. 8 ऑगस्टपर्यंतचा पहिला टप्पा
  2. 9 ते 12 ऑगस्टदरम्यानचा दुसरा टप्पा
  3. 13 ते 15 ऑगस्टचा तिसरा आणि मुख्य टप्पा
या तीनही टप्प्यांत अंमलबजावणीचे नियोजन काटेकोरपणे आणि सूचनांनुसार करावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी यंत्रणेला दिली.
राष्ट्रध्वज प्रत्येक घरावर फडकवा
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले की, हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर, तसेच शासकीय, निमशासकीय, सहकारी व खासगी कार्यालयांवर, अमृत सरोवर परिसरात, वारसा स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियोजन करण्यात यावे.
त्याचबरोबर ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम, स्पर्धा, रॅली, रोषणाई आदींचं आयोजन करण्यात यावं.
शाळा-महाविद्यालयांमध्ये उपक्रम
शाळा व महाविद्यालयांनी चित्रकला, भाषण, गीत, घोषवाक्य लेखन, देशभक्तीपर कार्यक्रम, प्रदर्शन, मिरवणूक, निबंध लेखन, व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना बळकट व्हावी, यासाठी यामध्ये अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करावा.
वारसा स्थळांवर रोषणाई, पोस्ट विभागाचे नियोजन
वारसा स्थळांवर आकर्षक प्रकाश योजना (रोषणाई) करून लोकांना आकर्षित करावे. याशिवाय पोस्ट विभागाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राख्या वेळेत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्याचेही निर्देश देण्यात आले.
फोटो, व्हिडिओ अपलोड अनिवार्य
सर्व विभागांनी व यंत्रणांनी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचे छायाचित्रे व व्हिडिओ शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या लिंकवर अपलोड करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले.

‘हर घर तिरंगा’ ही केवळ औपचारिकता नसून ती एक सामाजिक बांधिलकी आहे. देशप्रेमाची ही प्रबळ जाणीव प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवण्याचा हा संकल्प आहे – आणि तो आपण सर्वांनी मिळून साकार करायचा आहे.

आणखी वाचा