चिपळूण, दि. १२ : देशासाठी, जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत राहणारे अधिकारी आणि कर्मचारी सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबापासून दूर असतात. अशा सेवाभावी व्यक्तींप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करण्याच्या उद्देशाने समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या पुढाकाराने चिपळूण तालुक्यातील विविध कार्यालयांमध्ये ‘एक राखी देशासाठी… एक राखी भारतीय सेवेसाठी’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
या अंतर्गत पोलिस ठाणे, एस.टी. डेपो, कोकण रेल्वे स्थानक, तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधून भावबंधाची भावना व्यक्त करण्यात आली. सणांच्या काळात जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिस अधिकारी, एस.टी. चालक-वाहक, रेल्वे कर्मचारी यांना राखी बांधताना बहिणींच्या डोळ्यांत आनंद आणि अभिमानाचे भाव दिसत होते. यावेळी एस.टी. डेपोत प्रतीकात्मक स्वरूपात एस.टी. च्या स्टीयरिंगलाही राखी बांधून चालक-वाहकांच्या संरक्षणाची भावना व्यक्त करण्यात आली.
उपआयुक्त पोलीस राजेंद्र राजमाने (DYSP), चिपळूण आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, आगार सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पांडुरंग गुडेकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक सौ. काजरोळकर, लेखा अधिकारी कस्तुरी सुर्वे, लिपिक अर्चना ठसाळे, कोकण रेल्वे क्षेत्रीय पर्यवेक्षक विरेंद्र कुमार, डॉ. शिरीष मदार, RPF इन्स्पेक्टर व्ही.के. हाडके, वरिष्ठ अनुभाग अभियंता सुरेश मालगुणकर, स्टेशन मास्तर मशना डोणगावे, तसेच विविध विभागातील अनेक अधिकारी-कर्मचारी यांना मिळून एकूण २२५ राख्या बांधण्यात आल्या.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी सैनिक संभाजी चव्हाण, विद्यमान सैनिक राजेश कोकरे, इकबाल चिपळूणकर, साद कडवेकर, विजय खरात, प्रसाद वनगे, नितीन शिगवण, विवेक जाधव, हेमंत जाधव, सतीश गजमल, सुधीर मोरे, समीर कदम यांनी आर्थिक सहकार्य व परिश्रम घेतले.
कार्यक्रमात महिला पूजा सागवेकर, कमल कदम, शीतल नरळकर, अंकिता सकपाळ, दीपाली मोहिते, दैवता मोहिते, आर्या मोहिते, जयश्री जाधव यांनी राख्या बांधण्याचा मान मिळवला. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण आकाश मोहिते यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन पवार यांनी केले.
अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी सामाजिक विकास ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला. चिपळूण तालुक्यातील हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण ठरला.