गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना दिलासा; मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना गती, २१ कोटी ९० लाखांची तातडीची तरतूद

मुंबई, दि. १३ : कोकणात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात लाखो गणेशभक्तांचा मुंबई-गोवा महामार्गावरून होणारा प्रवास हा अनेकदा कोंडी, खड्डे, अपूर्ण कामे आणि वाहतूक विस्कळीततेमुळे त्रासदायक ठरत आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने धडक पावले उचलत निर्णायक निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपासच्या कामांसाठी २१ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे गणेशोत्सवाच्या काळातील प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

खासदार सुनिल तटकरे यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी उचललेल्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. मंत्रालयीन आणि क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी तसेच मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

२७ ऑगस्टपासून कोकणातील गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबई आणि परिसरातून लाखोंच्या संख्येने भाविक आपल्या गावी जातात. मात्र, महामार्गावरील अपूर्ण बोगदे, अपुऱ्या दुरुस्तीची कामे आणि ठिकठिकाणी असलेले खड्डे यामुळे प्रवास त्रासदायक होत असल्याची तक्रार जनआक्रोश समितीने १० ऑगस्ट रोजी पळस्पे फाटा, पनवेल येथे पाटपूजा करून आंदोलन सुरू करताना केली होती.

बैठकीत या मागण्यांचा तपशील ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पावले उचलत कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपासचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर केला. तसेच, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक देखरेख समिती स्थापन करून ही कामे पूर्ण होईपर्यंत काटेकोर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले.

यासोबतच महामार्गावर जिथे जिथे खड्डे आहेत, त्याबाबत प्रवाशांकडून तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्याचा निर्णय झाला. तक्रार आल्यानंतर पुढील २४ तासांत त्या ठिकाणी कार्यवाही करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

बैठकीनंतर जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. या महत्त्वाच्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या निर्णयामुळे यंदा गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीय आणि गणेशभक्तांना प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आणखी वाचा