मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी):: शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील न्यू अशोक नगर, वाशी नाका परिसरात मोठी दुर्घटना टळली. या भागातील संरक्षण भिंत कोसळून खालील बाजूस असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बाधित कुटुंबांचे हाल झाले आहेत.
रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेली बंद दोन घरे भिंतीसह कोसळली. भिंतीखालील भागात असलेल्या अनेक घरांचे छप्पर व भिंती पडून त्यांचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती.
ही माहिती मिळताच अणुशक्तीनगरच्या
आमदार सना मलिक-शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. बाधित कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करून त्यांना आवश्यक मूलभूत सोयी पुरविण्याचे निर्देश त्यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांना दिले. आपत्ती व्यवस्थापन विभाग, एम-पूर्व वॉर्ड, अग्निशमन दल तसेच आरसीएफ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू करण्यात आले.
घटनास्थळी अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने पाहणी करून सुरक्षिततेची उपाययोजना केली. आरसीएफ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आमदारांनी बाधितांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र पावसाच्या पार्श्वभूमीवर आणखी धोका टाळण्यासाठी या परिसरातील घरांची तपासणी व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.









