मुंबई, दि. २० : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आशिया चषक 2025 साठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली असून, यामध्ये पुन्हा एकदा श्रेयस अय्यरला डच्चू मिळाल्याने सोशल मीडियावर बीसीसीआयवर चाहत्यांनी जोरदार थयथयाट केला आहे. अनेकांनी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह विविध प्लॅटफॉर्मवर “अय्यरला न्याय मिळाला नाही” अशी भूमिका घेत बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली. काहींनी तर निवड समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र शब्दांत टीका केली आहे.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली नवा प्रयोग
या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाली असून, संघातील वरिष्ठ आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या गोलंदाजीवर संघाचा विश्वास दाखवण्यात आला आहे.
युवा खेळाडूंचा उदय
नव्या पिढीतील अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांना मोठी संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे अष्टपैलू खेळाडू संघाला स्थैर्य देतील. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोन यष्टिरक्षकांना स्थान देऊन निवड समितीनं पर्यायांचा विचार केला आहे. शिवाय, नवोदित वेगवान गोलंदाज हर्षित राणा याची निवड चर्चेचा विषय ठरली असून, त्याच्या कामगिरीकडं साऱ्यांचेच लक्ष लागलं आहे.
अय्यर आणि जायस्वाल वगळल्याने संताप
श्रेयस अय्यर आणि यशस्वी जायस्वालला संघातून वगळल्यानं क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. अय्यरच्या अनुभवाकडे आणि जायस्वालच्या आक्रमक फलंदाजीच्या फॉर्मकडे दुर्लक्ष झालं का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सोशल मीडियावर #JusticeForIyer आणि #YashasviDeservesBetter असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेकांनी “हा अय्यरविरोधी निर्णय आहे” अशी टीका केली आहे.
बीसीसीआयवर सोशल मीडियावर ‘थू थू’
चाहत्यांचा रोष सोशल मीडियावर उफाळून आला आहे. काहींनी बीसीसीआयला ‘पक्षपाती मंडळ’ म्हटलं तर काहींनी निवड समितीवर “युवा खेळाडूंवर प्रयोग करताना सिद्धहस्त खेळाडूंना डावललं” असा आरोप केला. अनेक चाहत्यांनी थेट बीसीसीआयवर “थू थू” असा सूर लावला असून, हा निर्णय पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करतोय.
आशिया चषक आणि विश्वचषकाची तयारी
आशिया चषक हा भारतीय संघासाठी केवळ किताब जिंकण्याची स्पर्धा नाही, तर आगामी टी-20 विश्वचषकासाठीचा महत्त्वाचा सराव टप्पा आहे. त्यामुळे निवडलेला हा संघ भारतीय क्रिकेटसाठी प्रयोगशाळा ठरणार आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली संघ आक्रमक शैलीत खेळेल अशी अपेक्षा आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या संतुलनामुळे संघ मजबूत दावेदार मानला जात असला तरी, अय्यर-जायस्वालच्या अनुपस्थितीची पोकळी चाहत्यांना खटकत राहणार आहे.
भारतीय संघ (आशिया चषक 2025):
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.