गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय : महाराष्ट्रातून ३६७ अतिरिक्त गाड्या; प्रवाशांना दिलासा

मुंबई, दि. २० : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे. यंदा राज्यातून तब्बल ३६७ अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार असून मुंबई ते कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये या विशेष सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक हृदयाचा ठोका आहे. दरवर्षी कोट्यवधी लोक आपल्या गावी गणपतीसाठी जातात. त्यामुळे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून यंदा ३६७ अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून, ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत अधिक आहे,” असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. “राज्य सरकारकडून उत्सवकाळातील गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त रेल्वे सेवांची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने ती सकारात्मकतेने मान्य केली. या निर्णयामुळे भाविकांना तिकिटे सहज उपलब्ध होतील, शिवाय गर्दीचेही नियोजन होईल,” असेही फडणवीस यांनी सांगितले.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध भागांत राहणारे कोकणातील रहिवासी दरवर्षी या काळात आपल्या गावी जातात. परंतु तिकीट मिळवणे आणि प्रवास करणे हे मोठे आव्हान ठरते. यंदा मात्र अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या गाड्या उत्सवाच्या संपूर्ण दहा दिवसांत धावतील. तसेच वाढत्या गर्दीचा विचार करून अतिरिक्त डब्यांची सोय देखील केली जाईल. यामुळे प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी प्रवास करता येईल.
रेल्वे व राज्य सरकारचा विश्वास आहे की, या उपक्रमामुळे भाविकांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल.

आणखी वाचा