इस्लामपूर/सांगली (प्रतिनिधी) – मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद, भारत आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास माजी आमदार भगवानराव साळुंखे, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील रेटरेकर, पोलीस अधिकारी गणेश कोंडते आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मांजर्डे गावचे सुपुत्र, थोर समाजसेवक व कुस्ती क्षेत्राचे आधारस्तंभ डॉ. श्रीकांत सीताराम रणखांबे यांना त्यांच्या कुस्ती खेळातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांच्या हस्ते ‘सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
डॉ. रणखांबे यांनी अनेक वर्षांपासून कुस्ती खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली. अखाडे उभारणे, स्पर्धांचे आयोजन, नामवंत मल्लांना एकत्र आणणे, विजेत्यांसाठी पहिल्या क्रमांकाची रक्कम स्वतः देणे, तसेच जखमी मल्लांचे मोफत शस्त्रक्रिया उपचार करणे अशा विविध मार्गांनी त्यांनी खेळाडूंसाठी निस्वार्थ कार्य केले आहे. त्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला बळ मिळाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल कालेल होते. यावेळी सुभाष भंडारे तसेच परिषद पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सोहळा यशस्वी केला.








