रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवात बाजारपेठेत २० ते २५ कोटींची उलाढाल

रत्नागिरी, दि. ३० : कोकणातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक भाविकांना एकत्र आणणारा सण म्हणजे गणेशोत्सव. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घराघरात आणि सार्वजनिक मंडपांत बाप्पाची प्रतिष्ठापना होताच, बाजारपेठांतही उत्सवाचे वातावरण फुलते. यंदाही रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारपेठा अक्षरशः फुलून आल्या होत्या. विविध साहित्य, गणेशमूर्ती, सजावट, मिठाई, पूजेचे साहित्य आणि दागिने यांच्या विक्रीतून जिल्ह्यात तब्बल २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांनी दिली.

१ लाख ६७ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

जिल्ह्यात यंदा १ लाख ६७ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या शाडूच्या मूर्तींबरोबरच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचीही विक्री झाली. जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजार मूर्तिकार कार्यरत आहेत. महागाईमुळे मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली. परिणामी मूर्तींच्या दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली. तरीसुद्धा भाविकांनी हौसेने मूर्ती खरेदी केल्यामुळे केवळ मूर्ती व्यवसायातूनच ८ ते १० कोटी रुपयांची उलाढाल झाली.

मखर व सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी

गणेशोत्सव म्हटला की मूर्तीइतकाच मखर आणि सजावटीलाही तितकेच महत्त्व असते. यंदा रेडिमेड मखर, पडदे, विद्युत माळा, झुंबर, कृत्रिम फुलांच्या माळा, तोरणे, रंगीत दिव्यांचे सेट, मण्यांच्या माळा अशा सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी होती. हौशी भाविकांनी मखर सजावटीवर खर्च करण्यात मागेपुढे पाहिले नाही. सजावटीच्या खरेदीतून तब्बल साडेआठ ते नऊ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.

मिठाई विक्रीचा गोडवा

सणासुदीला गोडधोड खाल्ले नाही तर उत्सवाची मजा काय? गणेशोत्सवाच्या काळात विविध प्रकारचे मोदक, पेढे, लाडू, चिवडा, फरसाण यांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. अनेक मिठाई विक्रेत्यांनी उकडीचे तसेच तळलेले मोदक खास ऑर्डरवर उपलब्ध करून दिले. गौरी पूजनासाठी करंजी, चकल्या, कडबोळी, शंकरपाळी, अनारसा यांसारख्या पदार्थांनाही विशेष मागणी होती. त्यामुळे मिठाई व्यवसायातून ३० ते ३५ लाख रुपयांची उलाढाल झाली.

फुलांचा सुगंध

मखर सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर वाढला असला तरी ताज्या फुलांची मागणी तितकीच कायम आहे. झेंडू, गुलाब, शेवंती, जरबेरा, डेलिया तसेच दुर्वांचे हार आणि जुड्या यांचा मोठा खप झाला. कृत्रिम पानाफुलांच्या माळांबरोबरच नैसर्गिक फुलांनीही बाजारपेठ गजबजून गेली. या क्षेत्रात २० ते २५ लाख रुपयांचा व्यवसाय झाला.

फळांच्या विक्रीत वाढ

गणेशमूर्तीसमोर नैवेद्याला विविध फळे अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे केळी, नारळ, चिबूड, काकडी यांसारख्या फळांना मोठी मागणी होती. त्याचप्रमाणे नैवेद्यासाठी हळदीची पाने, केळीची पाने यांचीही विक्री जोमात झाली. यामुळे फळव्यवसायातून ५ ते ६ लाख रुपयांची उलाढाल झाली.

पूजेचे साहित्य व भांडी

आरती, भजन व पूजेसाठी लागणारे धूप, अगरबत्ती, कापूर, वस्त्र, बुक्का, तुपाच्या तयार वाती, आरतीचे तबक, दिवे, करंडे, ताम्हण, पितळी व व्हाईट मेटलची भांडी यांची खरेदी उत्साहात झाली. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यामुळे ५ ते ७ लाखांचा व्यवसाय झाला.

दागिन्यांची चमक

भाविकांमध्ये दरवर्षी बाप्पाला सोन्या-चांदीची आभूषणे अर्पण करण्याची परंपरा आहे. यावर्षी चांदीचे मोदक, दुर्वा, त्रिशूळ, मुकूट, हार, बाजूबंद, कमरपट्टा आदी वस्तूंची खरेदी झाली. आर्थिकदृष्ट्या सक्षम भाविकांनी सोन्या-चांदीची आभूषणे खरेदी केली, तर सर्वसामान्यांनी इमिटेशन ज्वेलरीवर समाधान मानले. एका ग्रॅम सोन्याच्या वस्तूंनाही मोठी मागणी होती. त्यामुळे दागिन्यांची विक्री १० ते १५ लाखांच्या घरात झाली.

वाद्य व कपड्यांचा व्यवसाय

ढोलकी, पखवाज, टाळ, ढोलपथकांसाठी लागणारे मोठे ढोल यामुळे वाद्य व्यवसायात अडीच ते तीन लाखांची उलाढाल झाली. याशिवाय गणेशोत्सवात नवीन कपडे खरेदी करण्याची प्रथा असल्याने कपड्यांच्या विक्रीतून ५ ते ७ लाखांची उलाढाल झाली.

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

गणेशोत्सवामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किरकोळ तसेच घाऊक व्यापाऱ्यांना चांगला फायदा झाला. चाकरमान्यांच्या परतीमुळे स्थानिक बाजारपेठांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे कोकणातील व्यापाऱ्यांना उत्सवाच्या काळात मोठा हंगामी बुस्ट मिळाला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, या उलाढालीमुळे स्थानिक अर्थचक्राला नवीन ऊर्जा मिळाली असून आगामी काळातही हा कल कायम राहील.

आणखी वाचा