रत्नागिरी, दि. ०२ : पाच दिवस भक्तिभावाने पूजन-अर्चन झाल्यानंतर आज (मंगळवारी) जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. जिल्ह्यात तब्बल १ लाख १ हजार ३२९ घरगुती गणपती आणि १६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडणार आहे. यासाठी पोलिस दलाने किनारी भागात विशेष बंदोबस्त ठेवला असून गर्दी टाळण्यासाठी काटेकोर खबरदारी घेण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गणेशोत्सवाची रंगत
यंदा गणेश चतुर्थीला जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ४१७ घरगुती गणपती आणि १२६ सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दीड दिवसानंतर १३ हजार ८४४ घरगुती गणपती आणि ७ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. आता गौरी-गणपतीसह घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन भाट्ये व मांडवी किनाऱ्यावर, तसेच नदी-नाल्यांमध्ये व पाणवठ्यांवर पार पडत आहे.
लांज्यात उत्साही निरोप
लांजा शहरात सात दिवसांच्या गणरायाला आज सायंकाळी साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. आगरवाडी येथील बेनी नदीकाठी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या तालावर भक्तांचा उत्साह, तसेच सामूहिक आरतीने वातावरण भारावून गेले.
मुंबई-पुण्याहून परतलेल्या कोकणवासीयांनी या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याने गणेशोत्सवाची रंगत अधिकच वाढली. लांजा नगरपंचायतीकडून घाटांची स्वच्छता, तसेच विसर्जन मिरवणुकीचा मार्ग सुरळीत होण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”
सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत झालेल्या विसर्जनात भाविकांनी बाप्पाला डोळ्यांत पाणी आणून निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात विसर्जन घाटांवर भक्तीभावाचा उत्सव उंचावला.
गेल्या पाच दिवसांत आरत्या, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिल्ह्यातील गावे व वाड्या- वस्त्यांवर गणेशोत्सवाची रंगत खुलली होती. आता बाप्पाच्या निरोपानंतर पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची आतुरता सुरू झाली आहे.