राजापूर, दि. ०५ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी दुपारी राजापूर तालुक्यातील हातीवले टोल नाक्यावर झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. उभ्या ट्रकला भरधाव महिंद्रा मराझो कारने मागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे ही दुर्घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव राजेश शेखर नायडू (वय ३५, रा. मालाड पश्चिम, मुंबई) असे पोलिसांनी सांगितले.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा मराझो (गाडी क्रमांक एम एच ०२ इ झेड ४७४८) ही कार मुंबईतील मालाड येथून सहा प्रवाशांसह कणकवली तालुक्यातील भिरकोन्डकडे निघाली होती. प्रवासादरम्यान त्यांनी मधेच थांबून नाश्ता केला. त्यानंतर दुपारी ही गाडी राजापूरमधील हातीवले टोल नाक्यावर आली. याच दरम्यान महामार्गावर थांबलेल्या ट्रकला (गाडी क्रमांक एम एच १० ए डब्लू ८१४४) या गाडीने मागून जोरात धडक दिली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील लोक तात्काळ घटनास्थळी धावून आले.
या धडकेत कारमध्ये बसलेले प्रवासी राजेश नायडू यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि ते जागीच ठार झाले. तर, कारमधील उर्वरित पाच प्रवासी गंभीर जखमी झाले.
जखमींची नावे
या अपघातात तृशांत सुरेश शेलार (३२), कुणाल शिवाजी साळुंखे (३९), हर्षदा कुणाल साळुंखे (२८), प्रीती राजेश नायडू (२६) आणि श्राकांत नामदेव घाडगे (२८, सर्व रा. मालाड, मुंबई) हे पाच जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून सर्व जखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथे हलविण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांचे मदतकार्य
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मुन्ना खामकर, राजू कुरूप, नरेन कोंबेकर, अरविंद लांजेकर, प्रसाद मोहरकर, महेश कारेकर आणि संदीप राऊत यांसारख्या स्थानिक तरुणांनी धाव घेऊन जखमींना तातडीने मदत केली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते. पोलिस येईपर्यंत नागरिकांनी वाहतुकीचे नियंत्रण ठेवण्यासही हातभार लावला.
पोलिसांचा पुढील तपास
घटनास्थळावर राजापूर पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली आहे. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने रस्त्यावरील वाहने बाजूला करून मार्ग सुरळीत केला. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार अपघातांच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. हातीवले टोल नाक्यावरील हा अपघातही निष्काळजी वाहनचालकामुळे घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.