राजापूर, दि. ११ : राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कर्ज घोटाळ्याने जिल्ह्यात अभूतपूर्व खळबळ माजली आहे. अनेक खातेदारांनी कधीही कर्ज न घेतलेले असतानाही त्यांच्या नावे लाखो-कोट्यवधी रुपयांची कर्जे दाखवण्यात आली असून, थकीत हप्त्यांसाठी नोटिसा बजावण्यात आल्याने खातेदार अक्षरशः हादरले आहेत. संतप्त खातेदारांनी आज तालुका सहायक निबंधक कार्यालयात हजेरी लावली. सुनावणीदरम्यान अधिकारी आणि खातेदारांमध्ये जोरदार वादावादी झाली, एवढेच नव्हे तर वातावरण तापल्याने पोलिसांना घटनास्थळी बोलवावे लागले.
खोटी कर्ज प्रकरणे उघड
या घोटाळ्यात अनेक खातेदारांच्या नावे त्यांच्या नकळत कर्ज दाखवण्यात आले आहे. काहींवर २० लाख, ८० लाख तर काहींवर कोट्यवधी रुपयांची कर्जे असल्याचे कागदपत्र समोर आले आहेत. एकूण ३ कोटी रुपयांच्या खोट्या कर्जांसाठी नोटिसा काढल्याचे सांगितले जाते. सुनावणीदरम्यान एका खातेदाराच्या नावे तब्बल ८० लाखांचे कर्ज असल्याचे उघड झाले. या धक्कादायक माहितीनंतर संतप्त खातेदारांनी बँकेच्या संचालकांना वा जबाबदार अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची मागणी केली. मात्र बँकेकडून केवळ वकिलाला पाठवण्यात आले होते. त्यामुळे बँक जबाबदारी झटकत आहे, असा आरोप खातेदारांनी केला.
बँक अधिकाऱ्यांवर कारवाई
यापूर्वी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याला निलंबितही करण्यात आले आहे. तरीदेखील खातेदारांचा मनस्ताप कमी झालेला नाही. “आपण कधीच कर्ज घेतले नाही, जामीन राहिलो नाही, मग नोटिसा का?” असा सवाल उपस्थित खातेदारांनी केला. नोटिसा आलेले सुमारे ३५ जण आज सुनावणीला उपस्थित होते. त्यांनी एकत्र येत कार्यालयात गोंधळ घातला.
१०४ वर्षांच्या बँकेवर संशय
राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही सुमारे १०४ वर्षांचा इतिहास असलेली जुनी व प्रतिष्ठित बँक मानली जाते. मात्र या घोटाळ्यामुळे बँकेच्या कारभारावर गंभीर संशय उपस्थित झाला आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे आरोप होत आहेत. काही खातेदारांना आपण कर्ज घेतलेले नाही, तर काहींनी आपण जामीन राहिलेले नाही असे स्पष्ट सांगितले आहे. तरीदेखील बँकेने ठोस माहिती जाहीर केलेली नाही. यामुळे खातेदारांमध्ये संभ्रम आणि संताप दोन्ही वाढले आहेत.
आंदोलनाची पार्श्वभूमी
या प्रकरणी आधीही खातेदारांनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. आज पुन्हा मोठ्या संख्येने खातेदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात धाव घेतली. दिवसभर सुनावणी सुरू राहिली. अनेकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सविस्तर चौकशीची मागणी केली आहे.
बँक प्रशासन मौनात
घोटाळा समोर येऊनही बँकेच्या प्रशासकीय मंडळाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. निबंधक कार्यालयाकडेही खातेदारांना ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे “अखेरीस जबाबदार कोण?” हा प्रश्न उपस्थित होत आहे. बँक प्रशासनाची मौनव्रत्ती पाहून खातेदारांचा संताप आणखी वाढला आहे.
पुढे काय?
राजापूर अर्बन बँकेतील या घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील सहकारी बँकिंग व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जबाबदारांवर कठोर कारवाई करून खरी माहिती जाहीर करण्याची मागणी खातेदारांकडून होत आहे. जिल्हाभरातून आता या प्रकरणी सखोल चौकशी व सरकारने तातडीची भूमिका घ्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.