मुंबई, दि. २०: देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल म्हणून ओळखली जाणारी चेंबूर – संत गाडगे महाराज चौक मोनोरेल सेवा आजपासून (२० सप्टेंबर) अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, मोनोरेलचे अत्याधुनिकरण, तांत्रिक सुधारणा आणि नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी ही सेवा बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
मोनोरेल सेवेला सुरुवातीपासूनच तांत्रिक बिघाड, अपघात आणि आर्थिक तोट्यांचा सामना करावा लागला. प्रवाशांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरलेल्या या सेवेविषयी नाराजी सातत्याने व्यक्त केली जात होती. २०१७ मध्ये लागलेली मोठी आग, १९ ऑगस्ट २०२५ रोजी म्हैसूर कॉलनीजवळ कलंडलेली मोनोरेल, तसेच १५ सप्टेंबर रोजी वडाळा परिसरात अडकलेली गाडी अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नुकताच झालेल्या अपघातानंतर मोनोरेल अर्धा ते दोन तास अडकून प्रवाशांना श्वास गुदमरल्यासारखी अवस्था निर्माण झाली होती. अखेर या वारंवार बिघाडांमुळे एमएमआरडीएने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
एमएमआरडीएच्या माहितीनुसार, कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) प्रणाली प्रथमच या मार्गावर बसवण्यात येणार असून, त्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर तांत्रिक काम सुरू आहे. ३२ जागांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, २६० वायफाय ऍक्सेस पाईंट, ५०० RFID टॅग्स आणि ९० ट्रेन डिटेक्शन सिस्टीम आधीच बसवण्यात आले आहेत. या कामांनंतर मोनोरेलचे भविष्यातील संचलन सुरक्षित आणि निर्धोक होईल, असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत मेधा कंपनीने तयार केलेल्या १० नव्या गाड्यांपैकी ८ गाड्या मुंबईत दाखल झाल्या असून उर्वरित दोन गाड्या लवकरच येणार आहेत. नव्या गाड्यांच्या चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मोनोरेल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. मात्र ती केव्हा सुरू होईल, याबाबत निश्चित कालमर्यादा अद्याप जाहीर केलेली नाही.
मुंबईकरांना सुरुवातीला आशेने दिलेली ही मोनोरेल सेवा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक वर्षांच्या अपघातांच्या आणि तोट्यांच्या सावटाखाली मोनोरेलचे भविष्य आता आगामी तांत्रिक सुधारणा आणि नव्या प्रणालीच्या यशस्वी कार्यान्वयनावर अवलंबून राहणार आहे.