रत्नागिरी, दि. 21 सप्टेंबर 2025 : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. या चाचणीसाठी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परीक्षार्थींनी सहभाग नोंदवला.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सन 2022 ते 2027 या कालावधीत हा कार्यक्रम राबविला जात आहे. याचा उद्देश वय वर्षे 15 व त्यापुढील असाक्षर व्यक्तींना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान देणे हा आहे. परीक्षार्थ्यांचा उत्साही सहभाग पाहून नवसाक्षरता मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.
जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे निरक्षरतेचे निर्मूलन होऊन समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल.” रत्नागिरी जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणून दिल्ली येथे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. याआधीही नवभारत साक्षरता कार्यक्रम 2023-24 मध्ये अतिउत्कृष्ट कामाबद्दल शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते.
अचूक नियोजन, सातत्यपूर्ण कामगिरी, यंत्रणेतील सर्व घटकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर ठेवल्याचे दिसून आले. सर्व जिल्हा स्तर कार्यालयीन यंत्रणा, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी परीक्षेला भेट दिली. असाक्षर परीक्षार्थ्यांचा उत्साह आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे ही चाचणी यशस्वी झाली.