रत्नागिरी, 27 सप्टेंबर 2025: शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असते. मात्र काही दिव्यांग व्यक्ती अजूनही आधार कार्डपासून वंचित आहेत. या समस्येवर उपाय म्हणून रत्नागिरी तहसीलदार कार्यालयात शनिवारी (दि. 27 सप्टेंबर) दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
शिबिरात नवीन आधार कार्ड नोंदणीसह आधीच नोंदणीकृत असलेल्या आधार कार्डचे अपडेट, मोबाईल नंबर लिंक करणे किंवा बदलणे, आधार कार्डवरील फोटो आणि पत्ता बदलणे यांसह विविध सेवा लाभार्थींना उपलब्ध करून दिल्या. यामुळे आधार कार्डाशी संबंधित विविध अडचणी दूर झाल्या आणि दिव्यांगांना शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ घेता येण्यास मदत झाली.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी नायब तहसीलदार (निवडणूक शाखा) माधवी कांबळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी मि
त्र श्रीकांत जोशी, पांडुरंग नंदिवाले, शुभ्रा पोवार तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका व प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे उपस्थित होत्या. प्रकल्प संचालिकेने प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट करत, दिव्यांग व्यक्तींना आधार कार्डाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी आधार कार्ड केंद्र संचालक आसिफ मेमन, योगेश गुरव, मुसरत साही आणि श्रुती पावसकर यांनी विशेष मेहनत घेतली. शिबिर संपल्यानंतर लाभार्थींना आधार कार्डाची पावती (प्रदान स्लिप) अधिकार मित्र श्री. श्रीकांत जोशी, पांडुरंग नंदिवाले, शुभ्रा पोवार व प्रकल्प संचालिका सुरेखा पाथरे यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आली.
या उपक्रमात शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले. त्यांच्या आरोग्य, शिक्षण व सामाजिक सेवांशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, तसेच आधार कार्डबाबतच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे रत्नागिरीत दिव्यांगांना अधिक सुलभता मिळत असून, अशा उपक्रमांचे कौतुक होत आहे.
शिबिराच्या यशामुळे स्थानिक समुदायातही सकारात्मक संदेश पोहोचला असून, भविष्यात अशा उपक्रमांना नियमितरित्या आयोजन करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.