सभासद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करून चिपळूण नागरी पतसंस्थेचा ३२ वा वर्धापन दिन साजरा

चिपळूण, दि. १५ (अंकुश कदम) : “रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या ३२ वर्षांत चिपळूण नागरी पतसंस्थेने विश्वासाचा भक्कम पाया रचला आहे. ही संस्था केवळ बँक नसून माणसांच्या स्वप्नांची तिजोरी आहे. सहकार हा केवळ व्यवहार नसून एक विचार आहे आणि तो विचार चिपळूण नागरीने प्रत्यक्षात उतरवला आहे,” अशा शब्दांत माजी सहनिबंधक (लेखा परीक्षण अधिकारी) महाराष्ट्र राज्य, पुणे येथील तानाजी कवडे यांनी गौरवोद्गार काढले.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा ३२ वा वर्धापन दिन व दुग्ध उत्पादक प्रगतिशील शेतकरी सन्मान सोहळा बुधवारी सहकार भवन येथे उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांचा ७५ वा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी कवडे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, संस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, अॅड. नयना पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, संचालक अशोक कदम, सूर्यकांत खेतले, मनोहर मोहिते तसेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात संस्थेच्या माध्यमातून कर्जपुरवठा घेत दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी कवडे यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना म्हटले, “चिपळूण नागरी म्हणजे सहकारातील विद्यापीठ आहे. विश्वास, परिश्रम आणि प्रामाणिकपणा यांची सांगड जिथे असते, तिथे कायमस्वरूपी यश मिळतं. ही पतसंस्था त्या तिन्ही गुणांची प्रतिक आहे.”

कवडे यांनी यावेळी स्वतः दोन लाख रुपयांच्या ठेवीचा धनादेश संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते संस्थेला सुपूर्द केला. पुढे बोलताना त्यांनी “सहकार्याशिवाय सहकार नाही, आणि सहकाराशिवाय सहकार्य नाही,” असं सांगत सहकारभाव जोपासण्याचं आवाहन केलं.

ते पुढे म्हणाले, “कोकण ही भूमी भात आणि नारळासाठी ओळखली जात असली तरी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे या भूमीला दूध उत्पादन क्षेत्रात नवी ओळख मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य दाद देणारे हे कार्य कोकणासाठी अभिमानास्पद आहे.”

चिपळूण नागरीचे काम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरेल – सुभाषराव चव्हाण

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “सहकारातून रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबन देणारे काम चिपळूण नागरीने यशस्वीपणे केलं आहे. या संस्थेमुळे हजारो कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य आलं आहे.”

ते पुढे म्हणाले, “चिपळूण नागरी पतसंस्थेचं काम संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत ठरावं, अशीच आमची अपेक्षा आहे. सहकाराच्या माध्यमातून गावागावात आर्थिक बळकटी आणि सामाजिक ऐक्य निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.”

कार्यक्रमास वैभव चव्हाण, डॉ. स्वामीनी यादव, रामदास राणे, शशिकांत मोदी, संदीप पाटील, गणेश कदम, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, अनिल चिले, निनाद आवटी तसेच शेकडो सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळा आणि प्रेरणादायी संदेशांनी सहकारभावनेचा नव्याने जागर पुन्हा पेटवला.

आणखी वाचा