शेतकऱ्यांच्या माफीवरून विधानसभेत गोंधळ; नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित, विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. ०१ (प्रतिनिधी): विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गदारोळात गेला. राज्यातील शेतकऱ्यांच्या अपमानासंबंधी वादग्रस्त विधानांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर विरोधकांनी एकजुटीने सभात्याग करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
सकाळी विधानसभेचं कामकाज सुरळीत सुरू असताना प्रश्नोत्तरांच्या सत्रानंतर वातावरण अचानक पेटलं. शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची
शेतकऱ्यांच्या माफीच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना विरोधक. (छायाचित्र : अंकित कदम, प्रेस फोटोग्राफर, मुंबई)
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सहकाऱ्यांसोबत प्रवेश करताना काँग्रेसचे आमदार नाना पाटोले. (छायाचित्र : अंकित कदम, प्रेस फोटोग्राफर, मुंबई)
मागणी करत विरोधकांनी सभागृहात आक्रमक घोषणा सुरू केल्या. “शेतकऱ्यांची माफी मागा” अशा घोषणा देत काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार थेट वेलमध्ये उतरले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेकदा शांततेचे आवाहन केलं. त्यांनी विरोधकांना जागेवर बसण्याची विनंती केली. मात्र आक्रमक घोषणाबाजी सुरूच राहिल्याने कामकाज काही वेळ तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ कायम राहिला. यावेळी नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीकडे धाव घेत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं. यावर अध्यक्षांनी स्पष्ट इशारा दिला – “मला कारवाई करायला भाग पाडू नका.” मात्र विरोधक माघार घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भूमिका मांडली. “विधानसभा अध्यक्षांची खुर्ची ही लोकशाहीची प्रतिष्ठा आहे. नाना पटोले यांनी तिचा अवमान केला आहे. त्यांनी माफी मागावी,” अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र काँग्रेसने स्पष्ट नकार दिला.
अखेर अध्यक्षांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विरोधी पक्षांनी एकत्रितपणे सरकारवर हल्लाबोल करत सभात्याग केला. “या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!”, “माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा!”, अशा घोषणा सभागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यात घुमत राहिल्या.
ही संपूर्ण धामधूम भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानांवरून सुरू झाली. परतूर येथील शेतकरी मेळाव्यात लोणीकर यांनी, “शेतकऱ्यांना कपडे, मोबाईल, बूट, पैसे हे सरकारमुळे मिळतं,” असं वक्तव्य केलं होतं. तर मंत्री कोकाटे यांनी, “कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांनी लग्नात खर्च केले, पीकविम्याचा गैरवापर केला,” अशी टिप्पणी केली होती.
या विधानांवरून विरोधक संतप्त झाले असून सरकारने शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, ही मागणी त्यांनी पक्की केली आहे. आजचा संपूर्ण दिवस गदारोळ, निलंबन आणि घोषणाबाजीमध्येच गेला. अधिवेशनातील पुढील दिवसही अशाच वादळात जातील, अशी चिन्हं आहेत.

आणखी वाचा